वेरूळच्या घृष्णेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यातून मोबाइल लंपास, काही तासांत चोरटा जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2024 12:53 PM2024-08-27T12:53:40+5:302024-08-27T12:54:30+5:30
वेरूळ येथे चोरट्याकडून जप्त केलेला मोबाइल गुन्हे शाखेच्या पोलिसांनी भाविकास परत केला
खुलताबाद : श्रावण महिन्यातील चौथ्या सोमवारनिमित्ताने वेरूळ येथील घृष्णेश्वर मंदिरात दर्शनासाठी आलेल्या एका भाविकाचा मोबाइल चोरणाऱ्या आरोपीला पोलिसांनी पकडले. ही कारवाई दुपारी ३ वाजता करण्यात आली.
गेल्या दोन दिवसांपासून वेरूळ परिसरात पावसाची रिपरिप सुरू असल्याने मंदिराबाहेरील दर्शन रांगेतील भाविकांची मोठी गैरसोय झाली. तरीही भाविक पावसाची तमा न करता ‘बम बम भोले’, ‘हर हर महादेव’चा गजर करीत दर्शनासाठी पुढे पुढे जात होते. राज्यासह परराज्यातून आलेल्या अनेक भाविकांनी दर्शनाबरोबरच वेरूळ लेणी, तसेच धबधबा बघून पर्यटनाचा आनंद घेतला.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर येथील चैतन्य शिवाजी सुक्रे हे सोमवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास वेरूळ येथील श्री घृष्णेश्वर मंदिरात दर्शनासाठी आले असता त्यांचा मोबाइल मंदिर गाभाऱ्यातून चाेरट्यांनी लंपास केला होता. याबाबत तक्रार केल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज व गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळवून सुखदेव गोविंद काळे (रा. मुकुंदवाडी, छत्रपती संभाजीनगर) याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून सदर मोबाइल जप्त केला.
त्यानंतर हा मोबाइल सुक्रे यांना परत देण्यात आला आहे. परंतु या प्रकरणी सुक्रे यांनी पोलिसांत तक्रार देण्यास नकार दिला. ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे फौजदार जाधव, पोहेकाँ. सुनील खरात, गणेश सोनवणे, आनंद घाटेश्वर, जनाबाई चव्हाण, मनीषा पवार यांनी केली.