मोकाट कुत्र्यांनी तोडले बालिकेचे लचके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2019 11:13 PM2019-02-09T23:13:11+5:302019-02-09T23:13:52+5:30
शहरात मोकाट कुत्र्यांनी अक्षरश: धुमाकूळ घातला असून, सहा ते आठ कुत्र्यांच्या टोळीने पाचवर्षीय बालिकेचे लचके तोडल्याची घटना शनिवारी दुपारी सूतगिरणी परिसरातील मैदानावर घडली. यावेळी नागरिकांनी धाव घेत कुत्र्यांना पिटाळून लावल्याने बालिका बचावली.
औरंगाबाद : शहरात मोकाट कुत्र्यांनी अक्षरश: धुमाकूळ घातला असून, सहा ते आठ कुत्र्यांच्या टोळीने पाचवर्षीय बालिकेचे लचके तोडल्याची घटना शनिवारी दुपारी सूतगिरणी परिसरातील मैदानावर घडली. यावेळी नागरिकांनी धाव घेत कुत्र्यांना पिटाळून लावल्याने बालिका बचावली.
आकांक्षा शेजवळ, असे बालिकेचे नाव असून, तिला उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मिळालेली माहिती अशी, शनिवारी दुपारी इंदिरानगर भागातील कविता सागर शेजवळ या काबरानगर-इंदिरानगर परिसरातील मैदानावर दुचाकी शिकत होत्या. त्यांची मुलगी आकांक्षा चिमुकली खेळताना धावली आणि परिसरातील मोकाट कुत्र्यांच्या टोळीचे लक्ष तिच्याकडे गेले. त्यांनी तिचा पाठलाग केला. काही कळण्याच्या आत तिच्यावर हल्ला केला. अनेक कुत्रे अंगावर आल्याने आकांक्षा घाबरून पळाली, तेव्हा मोकाट कुत्र्यांनी तिला घेरून चावा घेणे सुरू केले. हा प्रकार आकांक्षाच्या आईच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरड केली; परंतु मोकाट कुत्रे काही केल्या दूर जात नव्हते. तेव्हा परिसरातील नागरिकांना हा प्रकार दिसला. नागरिकांनी धाव घेत कुत्र्यांना पिटाळून लावले; परंतु तोपर्यंत तिच्या हाताला, पायाला, पाठीला मोकाट कुत्र्यांनी चावा घेतला होता. त्यानंतर तिला तातडीने घाटी रुग्णालयात दाखल केले. सदर बालिकेवर आवश्यक ते उपचार करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. कैलास झिने यांनी दिली.
कचऱ्यासह मोकाट कुत्र्यांची समस्या गंभीर
शहरातील कचºयाच्या समस्येबरोबर मोकाट कुत्र्यांची समस्याही गंभीर बनली आहे. शहरातील विविध भागांत मोकाट कुत्र्यांचे टोळके दिसते. या दोन्ही समस्यांवर नियंत्रण येत नसल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे.