मोदीजी, ९ वर्षांपासून चकरा मारून थकलो,आतातरी शेतीसाठी वीज द्या; शेतकऱ्याचे प्रधानमंत्र्यांना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2022 07:28 PM2022-03-26T19:28:22+5:302022-03-26T19:31:55+5:30
२०१३ मध्ये भरले होते जोडणीचे पैसे, घायगावचा शेतकरी नऊ वर्षांपासून मारतोय चकरा
- बाळासाहेब धुमाळ
वैजापूर (औरंगाबाद ) :वीज जोडणी मिळत नसल्याने त्रस्त झालेल्या घायगाव येथील शेतकऱ्याने थेट पंतप्रधानांना पत्र पाठवून तक्रार दिली आहे. मी नऊ वर्षांपासून चकरा मारून थकलो, आता तुमच्याकडून न्यायाची अपेक्षा असल्याचे त्यात नमूद केले आहे. कोटेशन रक्कम भरूनही एवढ्या वर्षांपासून एका शेतकऱ्याला चकरा माराव्या लागणे यातून महावितरण कंपनीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.
घायगाव येथील कृष्णा रुस्तुम धने हे अल्पभूधारक शेतकरी आहेत. त्यांना २००७-८ या वर्षात शासनाच्या रोजगार हमी योजनेंतर्गत विहीर मिळाली. विहिरीला भरपूर पाणी लागल्याने पाणी उपसा केल्याशिवाय विहिरीचे काम करता येत नव्हते. त्यामुळे गटविकास अधिकाऱ्यांनी धने यांना विद्युतपुरवठा देण्याबाबत ७ जून २०१३ रोजी कार्यकारी अभियंता कन्नड यांना पत्र दिले. त्यानंतर धने यांनी १० जुलै २०१३ रोजी ५ हजार ३०० रुपये कोटेशन रक्कम जमा केली. मात्र, ९ वर्षे उलटून ही त्यांना वीज कंपनीने वीज जोडणी दिलेली नाही. त्यामुळे त्यांना विहीर पाण्याने भरलेली असूनदेखील तिचा वापर करता येत नाही. त्यामुळे ते मजुरी करतात. ते २०१३ पासून कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहेत. वीज कंपनीच्या एका अधिकाऱ्याने तर आता तू तक्रारी करू नको, अशी धमकी देखील दिली होती. त्यामुळे संतापलेल्या धने यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून तक्रार दाखल केली आहे. मला तुमच्याकडून न्यायाची अपेक्षा असल्याचे त्यात नमूद केले आहे.
जोडणी न दिल्यास आत्मदहन करणार
मी महावितरणकडे नऊ वर्षांपासून चकरा मारून थकलो आहे. तरीही मला वीज जोडणी मिळाली नाही. यासाठी पंतप्रधानांना पत्र लिहिले आहे. येणाऱ्या नव्वद दिवसांत मला वीज जोडणी दिली नाही तर वैजापूर वीज कंपनीच्या कार्यालयासमोर आत्मदहन करणार आहे.
-कृष्णा धने, शेतकरी, घायगाव
जवाहर रोजगार योजना सध्या सुरू नाही. शेतकरी धने यांनी नवीन वीज जोडणीचा प्रस्ताव सादर करावा. तो वरिष्ठांना पाठवून मंजूर करून घेऊ.
-राहुल बिडवे, उपकार्यकारी अभियंता, महावितरण, वैजापूर