विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तापूर्ण 'मोड्यूल्स', लोकं यापुढे म्हणतील जिल्हा परिषद शाळाच लय भारी!
By विजय सरवदे | Published: December 23, 2022 07:29 PM2022-12-23T19:29:05+5:302022-12-23T19:30:44+5:30
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाठी ‘गुणवत्ता कक्ष’ स्थापन
औरंगाबाद : शैक्षणिक गुणवत्तेबद्दल जि. प. शाळांकडे बघण्याचा अनेकांचा दृष्टिकोन नकारात्मक झाला आहे. त्यामुळे या शाळांची गुणवत्ता वाढविण्यासाठी, विद्यार्थ्यांना लेखन, वाचन, संभाषण, गणितीय क्रियांमध्ये निपुण करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी दहा तज्ज्ञ शिक्षकांचा ‘गुणवत्ता कक्ष’ निर्माण केला आहे. या कक्षातील शिक्षक वर्षभरासाठी ५२ आठवड्यांचे ‘मोड्युल्स’ तयार करत असून, जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून शाळांमध्ये प्रत्यक्ष कृतीला सुरुवात होणार आहे.
जि. प. शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मराठी, इंग्रजी सुस्पष्ट वाचता यावे. लिहिता यावे, या भाषांमध्ये उत्तमरीत्या संवाद साधता यावा, न अडखळता गणितीय क्रिया सोडविता याव्यात, त्यांच्यात नैतिकमूल्ये वाढीस लागावीत, आर्थिक व्यवहारासंबंधी त्यांचे ज्ञान प्रगल्भ करण्यासाठी गुणवत्ता कक्षामार्फत काम चालणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी मीना यांनी स्वत: जि. प. शाळांतील हुशार व टेक्नोसॅव्ही शिक्षकांच्या मुलाखती घेऊन दहा शिक्षकांची निवड करून गुणवत्ता कक्ष स्थापन केला आहे. सध्या या कक्षातील शिक्षक मराठी, इंग्रजी, गणिताचे अध्ययनस्तर निश्चितीसाठी, नैतिकमूल्ये, स्पर्धा परीक्षा आदी विषयांचे घटकसंच (मोड्युल) तयार करत आहेत. आठवड्यातील प्रत्येक दिवसी विषयनिहाय घटकसंचाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रशिक्षित केले जाणार आहे. काही घटकसंच शाळेत परिपाठाच्या वेळी विद्यार्थ्यांना दिले जाणार आहेत.
दुसरीकडे, कोरोनाकाळात विद्यार्थ्यांची अध्ययनक्षती भरून काढण्यासाठी इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी, इंग्रजी व गणित, तिसरी, चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी भाषा, गणित, परिसरअभ्यास, इंग्रजी आदी विषयांसाठी खेळ कृतीवर आधारित शैक्षणिक साहित्यसंच जि. प. शाळांना देण्यात आले आहेत. या संचात चित्रगप्पा, कल्पनात्मक देखावे तयार करणे, लेखनपूर्व तयारीसाठी रेषा सराव, पाटीचा वापर, अक्षर ध्वनीची ओळख, शब्दकोडे सोडवणे, दिनदर्शिकेची ओळख, अंकलेखन, अक्षरलेखन, गणितीप्रक्रिया, इंग्रजी अक्षरे व त्यातून शब्द निर्मिती, नकाशा जोडणे, नकाशावाचन, संख्यावाचन, नाणी व नोटांची ओळख व वापर आदी क्रियांचा समावेश आहे. संचासोबत मार्गदर्शिका देण्यात आल्या आहेत.
अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत प्रतिसाद
वडगाव कोल्हाटी जि. प. शाळेतील विद्यार्थ्यांचा या खेळ कृतीवर आधारित शैक्षणिक साहित्यसंचामुळे अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत प्रतिसाद वाढला आहे. संचातील सर्व शैक्षणिक साहित्य सहज हाताळण्याजोगे आहे. विद्यार्थी जोडीने, गटात बसवून हसत खेळत पाठ्यघटक समजून घेतात.
- सुनील चिपाटे, मुख्याध्यापक