पोलिसाचे घर फोडणाऱ्या ‘मोगली’ला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2018 06:42 PM2018-06-06T18:42:21+5:302018-06-06T18:43:16+5:30
रेल्वे पोलीस दलातील पोलिसाचे आणि एका बँक कर्मचाऱ्याचे घर फोडून हजारो रुपयांचा ऐवज पळविणारा कुख्यात घरफोड्या मोगली ऊर्फ स्वप्नील रमेश कुलकर्णी (रा. एकनाथनगर) याला उस्मानपुरा पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली.
औरंगाबाद : रेल्वे पोलीस दलातील पोलिसाचे आणि एका बँक कर्मचाऱ्याचे घर फोडून हजारो रुपयांचा ऐवज पळविणारा कुख्यात घरफोड्या मोगली ऊर्फ स्वप्नील रमेश कुलकर्णी (रा. एकनाथनगर) याला उस्मानपुरा पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून ६२ हजारांचा ऐवज पोलिसांना काढून दिला.
याविषयी अधिक माहिती अशी की, रेल्वेस्टेशन परिसरातील निवासी व रेल्वे सुरक्षा दलात कार्यरत असलेले सोपान फुलाजी सुरडकर हे २५ मे रोजी दुपारी सहकुटुंब मथुरा येथे देवदर्शनासाठी गेले होते. चोरट्यांनी संधी साधून त्यांचे घर फोडून दोन तोळ्याचे सोन्याचे गंठण आणि हजार रुपये किमतीचे चांदीचे पैंजण चोरून नेले. २८ मे रोजी त्यांचा पुतण्या त्यांच्या घरी गेला तेव्हा त्याला चोरी झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणी सुरडकर यांनी उस्मानपुरा ठाण्यात तक्रार नोंदविली होती.
दुसरी घटना विवेकानंदपुरम येथील साईवंदन अपार्टमेंटमध्ये ३० मे रोजी भरदिवसा घडली. अविनाश विश्वनाथ पेकमवार या बँक कर्मचाऱ्याच्या फ्लॅटचा क डीकोंडा तोडून चोरट्यांनी सुमारे एक तोळ्याच्या सोन्याच्या अंगठ्या, दोन गॅ्रमचे कर्णफु ले आणि दोन ग्रॅमचे सोन्याचे पेडंट चोरून नेले होते. याप्रकरणी पेकमवार यांनी उस्मानपुरा ठाण्यात तक्रार नोंदविली होती. पोलीस निरीक्षक घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे उपनिरीक्षक कल्याण शेळके, प्रल्हाद ठोंबरे, मनोज बनसोडे, संतोष सिरसाट, संजयसिंग डोभाळ यांनी तपास केल्यानंतर पोलिसांच्या रेकॉर्डवरील संशयित आरोपी मोगली ऊर्फ स्वप्नील कुलकर्णी यानेच चोरी केल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी २ जून रोजी एकनाथनगर येथून मोगलीला ताब्यात घेतले.
चौकशीअंती त्याने गुन्ह्याची कबुली देत दोन्ही घरे फोडल्याचे सांगितले. या दोन्ही घटनांमध्ये त्याने पळविलेल्या मुद्देमालापैकी ६२ हजारांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला. या आरोपींकडून घरफोडीचे आणखी गुन्हे उघडकीस येतील,असे पोलिसांनी सांगितले. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक कोमल शिंदे करीत आहेत.