‘मोकाटां’चा उपद्रव जीवघेणा
By Admin | Published: August 25, 2016 12:48 AM2016-08-25T00:48:42+5:302016-08-25T01:02:09+5:30
हणमंत गायकवाड , लातूर मोकाट जनावरांचा उपद्रव इतका वाढला आहे की, कालच पशुपतिनाथ नगरात एका कटाळ्याने दोघांना गंभीर जखमी केले. मात्र मनपाची कारवाई धीम्या गतीने सुरू आहे.
हणमंत गायकवाड , लातूर
मोकाट जनावरांचा उपद्रव इतका वाढला आहे की, कालच पशुपतिनाथ नगरात एका कटाळ्याने दोघांना गंभीर जखमी केले. मात्र मनपाची कारवाई धीम्या गतीने सुरू आहे. बुधवारी ‘लोकमत’ने शहरातील वर्दळीच्या रस्त्यांवरील मोकाट जनावरांची मोजदाद केली असता १३६२ मोकाट जनावरे आढळून आली. त्यांनी रस्तेच अडवून ठेवले होते.
शहरातील अण्णा भाऊ साठे चौक, शाहू चौक, डॉ. आंबेडकर चौक, विलासराव नगर नांदेड रस्ता, नांदेड नाका पाण्याची टाकी, गरुड चौक, शिवाजी चौक, राजीव गांधी चौक, रेणापूर नाका तसेच गल्लीबोळांतील वर्दळीच्या रस्त्यांवर या मोकाट जनावरांचा ठिय्या होता. वाहतुकीलाच अडथळा होता. या प्रत्येक चौकांत दहा ते पंधरा जनावरांचा ठिय्या होता. मनपाने मात्र बुधवारी केवळ एक जनावर कोंडवाड्यात टाकले. मंगळवारी १० जनावरे अशी एकूण ११ जनावरे कोंडवाड्यात आहेत. ‘लोकमत’ने शहरातील वेगवेगळ्या भागांत जाऊन पाहिले असता १३६२ मोकाट जनावरांचा उपद्रव दिसून आला. प्रकाश नगर येथील सरस्वती शाळेसमोर विद्यार्थी तसेच वाहनधारकांची मोठी वर्दळ असते. येथेही सात जनावरांनी रस्ता अडवून ठेवला होता. त्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. दररोजचीच ही स्थिती आहे. मनपाच्या कारवाईत मात्र गांभीर्य नाही.