जोगेश्वरीत अंगणवाडी इमारतीच्या बांधकामाला मिळाला मुहूर्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:06 AM2021-03-04T04:06:33+5:302021-03-04T04:06:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वाळूज महानगर : जोगेश्वरीतील नवीन अंगणवाडी इमारतीच्या बांधकामाला अखेर मुहूर्त मिळाला आहे. या अंगणवाडी बांधकामाचे भूमिपूजन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
वाळूज महानगर : जोगेश्वरीतील नवीन अंगणवाडी इमारतीच्या बांधकामाला अखेर मुहूर्त मिळाला आहे. या अंगणवाडी बांधकामाचे भूमिपूजन बुधवारी (दि. ३) करण्यात आले. जवळपास ३४ लाख रुपयांचा निधीतून परिसरात चार अंगणवाड्या उभारण्यात येणार आहेत.
वर्षभरापासून जोगेश्वरीतील अंगणवाड्यांसाठी जिल्हा परिषदेच्या जिल्हा नियोजन समितीने निधी मंजूर केला आहे. मात्र, ग्रामपंचायतीकडून जागा उपलब्ध होत नसल्यामुळे अंगणवाडी इमारतींचे बांधकाम रखडले होते. गरीब कामगारांच्या पाल्यांसाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन जागा उपलब्ध करुन दिल्यानंतर जोगेश्वरी येथे बुधवारी दोन तर कमळापूर व रामराई येथे प्रत्येकी एक अशा चार अंगणवाडी इमारतींच्या बांधकामाचे भूमिपूजन नवनिर्वाचित सरपंच गजाजन बोंबले, उपसरपंच प्रवीण दुबिले, सामाजिक कार्यकर्ते अमोल लोहकरे, माजी सरपंच सोनूताई लोहकरे आदींच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्या मीना पनाड, शाहीन शेख, सोनू लोहकरे, भारती साबळे, हिरा सौदागर, संगिता ठोकळ, योगिता आरगडे, शीला वाघमारे, रुख्मिणी काजळे, शांताबाई बिलवाल, नजीरखॉ पठाण, योगेश दळवी, अनिल वाघ, प्रभाकर काजळे, प्रवीण थोरात, सामाजिक कार्यकर्ते रफीक पटेल, शेख मोईस, पंडित पनाड, सुनील वाघमारे, सुरेश वाघमारे, हबीब अन्वर उल्ला आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
चार अंगणवाड्यांसाठी ३४ लाखांचा निधी
जोगेश्वरी, कमळापूर व रामराई येथील अंगणवाड्या भाड्याच्या इमारतीत सुरु होत्या. ग्रामपंचायतीने गावठाण हद्दीतील जागेवर इमारतीचे बांधकाम करण्याचा निर्णय घेतल्याचे सरपंच गजाजन बोंबले यांनी सांगितले. या अंगणवाडीच्या बांधकामासाठी जिल्हा परिषदेच्या जिल्हा नियोजन समितीमधून ३४ लाखांचा निधी मंजूर केल्याची माहिती महिला व बालविकास अधिकारी कमल कोरे, अंगणवाडी पर्यवेक्षिका मीना काळे यांनी दिली.
फोटो ओळ - जोगेश्वरी व कमळापुरात नवीन अंगणवाडी इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजनप्रसंगी सरपंच गजाजन बोंबले, उपसरपंच प्रवीण दुबिले आदी मान्यवर उपस्थित होते.
------------------------