सोमवारपासून रस्त्यांचे काँक्रिटीकरण सुरू होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 06:25 PM2019-01-19T18:25:02+5:302019-01-19T18:25:23+5:30
२१ जानेवारीपासून प्रत्यक्ष रस्त्यांवर सिमेंट पडण्यास सुरुवात होणार आहे. टीव्ही सेंटर ते एन-६ स्मशानभूमीपर्यंतच्या कामाला सुरुवात होईल.
औरंगाबाद : राज्य शासनाने दिलेल्या १०० कोटींच्या अनुदानातून शहरातील ३० मोठे रस्ते सिमेंट पद्धतीने गुळगुळीत करण्यात येणार आहेत. २१ जानेवारीपासून प्रत्यक्ष रस्त्यांवर सिमेंट पडण्यास सुरुवात होणार आहे. टीव्ही सेंटर ते एन-६ स्मशानभूमीपर्यंतच्या कामाला सुरुवात होईल. सिमेंट रस्त्यांसाठी शहरात मोठी वाहने येतील. वाहतूक पोलिसांनी या वाहनांना थांबवून ठेवू नये, अशी मागणी आज कंत्राटदारांनी केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३ जानेवारी रोजी १०० कोटींच्या रस्त्यांचे भूमिपूजन टीव्ही सेंटर येथे केले होते. महापालिकेने शहरात कुठेच कामे सुरू न केल्याने सर्वत्र ओरड सुरू झाली होती. १६ जानेवारीच्या सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी कामे कधी सुरू करणार? तारीख सांगा म्हणून प्रशासनाची चांगलीच कोंडी केली होती. शुक्रवारी सकाळी महापौर नंदकुमार घोडेले यांनी १०० कोटींची कामे करणाऱ्या विभागातील अधिकारी व कर्मचाºयांसह कंत्राटदारांची बैठक घेतली. बैठकीत कंत्राटदारांनी आम्ही कामे सुरू करण्यास एका पायावर तयार असल्याचे नमूद केले. महापालिका प्रशासनच सहकार्य करीत नसल्याचे सांगण्यात आले. डिफर पेमेंट पद्धतीवर तयार करण्यात आलेल्या जुन्या रस्त्यांवर सिमेंट रस्ते करायचे आहेत. त्यामुळे तेथे माती परीक्षणाची गरज नाही. मनपा अधिकाºयांनी फक्त मार्किंग करून दिली तरी कामे सुरू करता येतील, असे सर्व कंत्राटदारांनी नमूद केले.
वाहतूक पोलिसांची परवानगी
सिमेंट रस्ते तयार करताना आरएमसी प्लँटमधून मोठी वाहने निघतात. ही वाहने जेथे काम सुरू आहे, तेथे पोहोचण्यास बºयाच अडचणी येतात. ठिकठिकाणी वाहतूक पोलीस अडवून करतात. या वाहनाला जास्त वेळ उभे करता येत नाही. त्यात सिमेंटचे ओले मटेरियल असते. ते सतत फिरत ठेवावे लागते. थोड्या वेळासाठीही वाहन बंद पडले तर सिमेंट साचून जाते. वाहतूक शाखेचे सहायक पोलीस आयुक्त हनुमंत भापकर यांच्यासोबत महापौरांनी चर्चा केली. भापकर यांनी रस्त्यांसाठी वाहन आणण्याची परवानगी देण्यात येईल, असे नमूद केले.
३० अंश तापमान
सिमेंट रस्ते तयार करताना कडक उन्हाळा अजिबात चालत नाही. ३० अंशांपेक्षा अधिक तापमानात काम सुरू केल्यास रस्त्याला तडे जाण्याची दाट शक्यता असते. महापालिकेच्या कंत्राटदारांना सध्या थंडी असेपर्यंत दिवसा आणि नंतर रात्री काम करावे लाणगार आहे. थंडी असेपर्यंत जास्तीत जास्त कामे करण्यासाठी कंत्राटदारांची धडपड सुरू आहे.