Aurangabad Metro साठी मोंढा नाका, सेव्हन हिल उड्डाणपूल पाडावे लागणार !
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2022 08:14 PM2022-11-01T20:14:57+5:302022-11-01T20:15:30+5:30
औरंगाबाद निओ मेट्रो प्रकल्प : सिडको, क्रांतीचौक, महावीर चौकातील पूल वाचणार
औरंगाबाद : शेंद्रा ते वाळूजपर्यंत एकच अखंड उड्डाणपूल, त्यावर निओ मेट्रोचा पूल उभारण्यासाठी महामेट्रो कंपनीकडून कच्चा ‘डीपीआर’ (सविस्तर प्रकल्प आराखडा) तयार करण्यात आला असून, सोमवारी स्मार्ट सिटी कार्यालयात केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्यासमोर सादरीकरण करण्यात आले. या आराखड्यात अनेक फेरबदल अपेक्षित आहेत, मात्र जालना रोडवरील मोंढा नाका, सेव्हन हिल हे दोन मोठे उड्डाणपूल अक्षरश: पाडावे लागणार आहेत. उर्वरित तीन उड्डाणपूल वाचविण्यात यश आले आहे.
औरंगाबाद स्मार्ट सिटीने महामेट्रोला जालना रोडवर एकच उड्डाणपूल आणि मेट्रो प्रकल्पाचा ‘डीपीआर’ तयार करण्यासाठी सहा महिन्यांपूर्वी वर्क ऑर्डर दिली. दोन पूल उभारण्यासाठी ६ हजार २७८ कोटींचा कच्चा ‘डीपीआर’ तयार करण्यात आला. स्मार्ट सिटी कार्यालयात महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सादरीकरण केले. यावेळी खा. इम्तियाज जलील, आ. हरिभाऊ बागडे, प्रदीप जैस्वाल यांची विशेष उपस्थिती होती.
सादरीकरणानंतर केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, शहर झपाट्याने वाढत आहे. शैक्षणिक, औद्योगिकीकरण, पर्यटन वाढत आहे. केंद्र शासनाने मेट्रोसाठी काही निकष ठरविले आहेत. जालना रोडवर ताशी किती वाहने ये-जा करतात त्यावर मेट्रो प्रकल्प राबविण्यात येतो. जालना रोडवर ८ हजार वाहनक्षमता असल्याने आपल्याला निओ मेट्रो म्हणजे एअर बससारखी मेट्रो उभारता येईल. या प्रकल्पाचे सादरीकरण लवकरच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, हरदीपसिंग पुरी यांच्यासमोर होईल.
जालना रोडवर हा प्रकल्प उभारताना कोणत्या अडचणी येऊ शकतात, यादृष्टीने शहरातील सर्व शासकीय कार्यालयांचे अधिकारी बैठकीला उपस्थित होते. छोट्या-छोट्या मुद्यांवर सखोल चर्चा झाली. तांत्रिक अडचणी दूर होतील. २०२३ मध्ये हा प्रकल्प मंजूर झाल्यावर तेथून तीन वर्षांत काम पूर्ण होईल. जालना रोडवरील मोंढा नाका आणि सेव्हन हिल उड्डाणपूल पाडावे लागतील. सिडको, क्रांतीचौक, महावीर चौक येथील पूल जशास तसे राहतील, असेही कराड यांनी नमूद केले.
कोट्यवधी रुपयांचा खर्च
रस्ते विकास महामंडळाने २० जून २०१६ रोजी माेंढानाका उड्डाणपुलाचे लोकार्पण केले होते. अवघ्या सहा वर्षांत हा पूल पाडण्याचा विषय आता सुरू झाला आहे. ५०० मीटर लांबी या पुलाची आहे. त्याचप्रमाणे २००१ मध्ये सेव्हन हिल उड्डाणपूल उभारण्यात आला. दोन्ही पुलांवर महामंडळाने कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत.