जगण्यासाठी आधी रुग्णालयात अन् मृत्यूनंतर स्मशानात हवेत पैसे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:02 AM2021-04-21T04:02:02+5:302021-04-21T04:02:02+5:30

औरंगाबाद : कोरोनात माणसाला जिवंत ठेवायचे असेल, तर खासगी रुग्णालयाच्या काऊंटरवर उपचाराआधी भरघोस रक्कम द्यावी लागते. दुर्दैवाने रुग्ण ...

Money in the air in the hospital and in the cemetery after death! | जगण्यासाठी आधी रुग्णालयात अन् मृत्यूनंतर स्मशानात हवेत पैसे !

जगण्यासाठी आधी रुग्णालयात अन् मृत्यूनंतर स्मशानात हवेत पैसे !

googlenewsNext

औरंगाबाद : कोरोनात माणसाला जिवंत ठेवायचे असेल, तर खासगी रुग्णालयाच्या काऊंटरवर उपचाराआधी भरघोस रक्कम द्यावी लागते. दुर्दैवाने रुग्ण दगावला, तर स्मशानभूमीतही पैसेच मोजावे लागतात. गरीब-श्रीमंत असे काहीही बघितले जात नाही. फक्त बघितल्या जातात त्या नोटा...!

प्लेग, स्पॅनिश फ्लू अशा अनेक महामाऱ्या यापूर्वी जगभरात पसरलेल्या. प्रत्येक महामारीत लाखो लोक मरण पावले. कोरोना महामारीने सध्या संपूर्ण जगाला वेठीस धरले आहे. महामारीत कुठे माणुसकीचे दर्शन घडते, तर कुठे निव्वळ पैसा कमविण्याचा उद्योग सुरू आहे.

ऐतिहासिक औरंगाबाद जिल्ह्यात वर्षभरात १ लाख १० हजार ४९३ नागरिकांना कोरोनाची लागण झाली. २ हजार १८० रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या १५ हजार ६३० सक्रिय रुग्ण आहेत.

रुग्णालयात बेड, स्मशानभूमीत जागा मिळेना

शहरात व्हेंटिलेटर बेड मिळविणे अशक्यप्राय झाले आहे. कोरोना रुग्णाच्या नातेवाईकांनी खासगी रुग्णालयांमध्ये अथक्‌ परिश्रम घेतल्यानंतर व्हेंटिलेटर किंवा ऑक्सिजन बेड भेटत आहे. रुग्ण दाखल करण्यापूर्वी ५० हजार, तर कुठे १ लाख रुपये ॲडव्हान्सपोटी भरावे लागतातच. त्याशिवाय रुग्णाला प्रवेशच भेटत नाही. रुग्ण कितीही गंभीर असला तरी, खासगी रुग्णालयाला त्याच्याशी काही देणे-घेणे नाही. रुग्ण बरा होऊन घरी गेला, तर किमान दोन ते अडीच लाख रुपये बिल होते आणि मरण पावल्यानंतरही दोन ते तीन लाख रुपये बिल करण्यात येते. बिल भरल्याशिवाय रुग्णालये मृतदेहच देत नाहीत. बिल देऊन मृतदेह घेऊन स्मशानभूमीत नेल्यानंतर, तेथे अंत्यविधीसाठी नातेवाईकांना तासन्‌ तास उभे राहावे लागते.

नावालाच मोफत अंत्यसंस्कार योजना

दररोज २५ ते २८ रुग्णांचा मृत्यू होत आहे. प्रत्येक मृतावर शहरातच अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. महापालिकेने अंत्यसंस्कारासाठी २ एनजीओंची नियुक्ती केली आहे. एक संस्था मोफत अंत्यसंस्कार करीत आहे. दुसऱ्या संस्थेला महापालिका एका अंत्यसंस्कारासाठी अडीच हजार रुपये मानधन देते. स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यासाठी अडीच हजार रुपये महापालिकेकडून वेगळे देण्यात येतात. महापालिकेचे ५ हजार रुपये एका मृतदेहावर खर्च होतात. लाकडे महाग झाली म्हणून स्मशानजोगी प्रत्येक मृतदेहाच्या नातेवाईकांकडून वेगळे पैसे उकळतातच. मोफत असतानाही एक संस्था नातेवाईकांकडून १० ते १५ हजार रुपये उकळते आहे. महापालिका एका मृतदेहासाठी ५ पीपीई कीट मोफत देते. या पीपीई कीटचे पैसेही नातेवाईकांकडून उकळण्यात येतात.

हे घ्या पुरावे...

सातारा परिसरातील ६८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. एन- ६ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. अतिरिक्त लाकूड लागले, म्हणून नातेवाईकांकडून एनजीओ आणि स्मशानजोगीने वेगळी रक्कम वसूल केली.

रोशनगेट भागातील ५८ वर्षीय नागरिकावर किलेअर्क येथील कब्रस्तानात दफनविधी करण्यात आला. एनजीओच्या कार्यकर्त्यांनी कफन, कबर खाेदणारा, पीपीई कीट आदी साहित्याचे कारण दाखवून पैसे घेतले.

महापालिकेकडून कोविड रुग्णांसाठी मोफत अंत्यसंस्कार योजना सुरू करण्यात आलेली आहे. अतिरिक्त पैसे घेतले तर नागरिकांनी तक्रार केल्यास संबंधितांवर त्वरित कारवाई करण्यात येते. मागील काही दिवसांमध्ये अशा प्रकारची कोणतीही तक्रार लेखी स्वरूपात प्राप्त झालेली नाही.

- डॉ. नीता पाडळकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, मनपा.

Web Title: Money in the air in the hospital and in the cemetery after death!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.