औरंगाबाद महापालिकेत पैशांचा; शहरात पाण्याचा ठणठणाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2018 10:48 PM2018-11-01T22:48:38+5:302018-11-01T22:50:48+5:30
शहरात दिवाळी सणाच्या तोंडावर पाण्याचा, तर पालिकेत पैशांचा ठणठणाट असल्याचे गुरुवारी सर्वसाधारण सभेत समोर आले.
औरंगाबाद : शहरात दिवाळी सणाच्या तोंडावर पाण्याचा, तर पालिकेत पैशांचा ठणठणाट असल्याचे गुरुवारी सर्वसाधारण सभेत समोर आले. आॅक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात १८ कोटी ५० लाखांहून अधिक बिलांची रक्कम मुख्य लेखा विभागाने अदा केल्यामुळे संबंधित यंत्रणा संशयाच्या भोवºयात आली आहे, तर जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत येणाºया १५० एमएलडीपैकी ४५ एमएलडी पाण्याची गळती होत असल्यामुळे शहराला कमी मिळत असल्याचे एका पाहणीअंती समोर आले आहे.
जायकवाडी धरण ते नक्षत्रवाडीपर्यंत तब्बल तीस टक्के पाणी वाया जात असल्याचे तांत्रिक सल्लागार राजेंद्र होलाणी यांनी एका पाहणीतून समोर आणले आहे. पालिकेच्या विद्यमान जलवाहिन्यांचे आयुष्य चाळीस वर्षांचे झाले असून, त्या योजनांची कार्यक्षमता संपली आहे. त्यांची दुरुस्ती करून पाणी वाढविता येईल, याचे सादरीकरण होलाणी यांनी गुरुवारी सभेत केले. सध्या ७०० व १,४०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीने पाणीपुरवठा करण्यात येतो. या दोन्ही जलवाहिन्यांची निर्वहन क्षमता संपली आहे. त्यामुळे शहरात कमी पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांची वणवण सुरू आहे. जलवाहिन्यांची क्षमता नसल्याने गळत्या वाढल्या आहेत. ७०० मि.मी.च्या जलवाहिनीतून १३ टक्के, तर १,४०० च्या जलवाहिनीतून १७ टक्क्यांपर्यंत पाणीगळती होत आहे. ही स्थिती फक्त नक्षत्रवाडीपर्यंतची आहे. शहरातील गळत्यांचा अद्याप अभ्यास झालेला नाही. शहराच्या लोकसंख्येला दररोज २७८ एमएलडी पाणी हवे आहे. मात्र, प्रत्यक्षात १०५ ते १२० एमएलडीच पाणी येते. दोन दिवसाआड पाणी का देऊ शकत नाही? असा प्रश्न सर्वपक्षीय नगरसेवकांनी केला. अभ्यासाअंती त्यावर बोलता येईल, असे होलाणी यांनी सांगितले.
बिल वाटपाचा कारभार चौकशीच्या फेºयात
मनपा तिजोरीत पैशांअभावी ठणठणाट असताना गेल्या पंधरा दिवसांत मुख्य लेखाधिकारी सुरेश केंद्रे यांनी ठेकेदारांची तब्बल साडेअठरा कोटी रुपयांची बिले काढल्याची माहिती सर्वसाधारण सभेत समोर आली. अधिकाºयांनी पाच-पाच टक्के घेऊन बिले काढल्याचा आरोप यावेळी भाजप नगरसेवकांनी केला. नगरसेवकांच्या मागणीवरून बिल वाटपाची चौकशी करण्याचे आदेश महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिले. अधिकाºयांनी ज्येष्ठता यादी डावलून कोणत्या पदाधिकारी, नगरसेवक आणि अधिकाºयांच्या सांगण्यावरून बिले काढली हे समोर यावे, अशी मागणी नगरसेवकांनी केली. त्यावर महापौर घोडेले यांनी कार्यकारी अभियंता डी.पी. कुलकर्णी यांच्यामार्फत बिल वाटप प्रकरणाची चौकशी करून १५ नोव्हेंबरपर्यंत अहवाल देण्याचा आदेश दिला.
टक्केवारीचा कारभार चव्हाट्यावर
बिले काढण्यासाठी संबंधित यंत्रणा दोन टक्के रक्कम घेत असल्याचे मनपा वर्तुळात नेहमीच बोलले जाते. मात्र, गुरुवारी नगरसेवकांनी सभेत लेखा विभागातील अधिकाºयांच्या टक्केवारीचे बिंग फोडणारे आरोप केले. आता दोन नव्हे, तर पाच-पाच टक्के रक्कम घेऊन बिले काढले जात असल्याचा आरोपही नगरसेवकांनी केला.