रेल्वेने पैसे तर बसने वेळ वाचणार; तुम्ही कसे जाणार पुण्याला ? नांदेड-पुणे एक्स्प्रेस आता दररोज
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2022 12:20 PM2022-07-04T12:20:15+5:302022-07-04T12:21:07+5:30
आजपासून दररोज रेल्वे: केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते सोमवारी दुपारी ४ वाजता जालना रेल्वेस्टेशनवर नांदेड-पुणे एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन होणार आहे.
- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणानिमित्त औरंगाबादहून पुण्याला ये-जा करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. आजपर्यंत प्रवासासाठी एसटी बस आणि ट्रॅव्हल्सकडे प्रवाशांचा अधिक ओढा आहे. मात्र आता सोमवारपासून पुण्यासाठी दररोज रेल्वे धावणार आहे. रात्री प्रवास करून पहाटे पुण्याला पोहोचणे शक्य होणार आहे. रेल्वेचा प्रवास सुरक्षित, आरामदायक आणि किफायतशीर म्हटला जातो; पण यापुढे वेळ आणि पैशांचे गणित सोडवून प्रवाशांना पुण्याचा प्रवास रेल्वेने करायचा की बसने, हे ठरवावे लागणार आहे.
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते सोमवारी दुपारी ४ वाजता जालना रेल्वेस्टेशनवर नांदेड-पुणे एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन होणार आहे. नांदेड - हडपसर द्विसाप्ताहिक एक्स्प्रेसचा विस्तार पुण्यापर्यंत करण्यात आला असून, या रेल्वेची वेळही बदलण्यात आली आहे. ही रेल्वे राेज धावणार आहे. बहुतांश ट्रॅव्हल्स रात्री धावतात. त्यामुळे या रेल्वेचा ट्रॅव्हल्सवर परिणाम होण्याची चिंता ट्रॅव्हल्सचालकांना सतावत आहे.
नांदेड - पुणे एक्स्प्रेस ही रेल्वे गाडी औरंगाबाद रेल्वे स्थानकावर रात्री ८.२० वाजता येईल. रात्री ८.२५ वाजता ही रेल्वे रवाना होईल आणि पुण्याला पहाटे ५.३० वाजता पोहोचेल. पुणे - नांदेड एक्स्प्रेस औरंगाबाद रेल्वे स्थानकावर पहाटे ५.०५ वाजता येईल आणि ५.१० वाजता नांदेडकडे रवाना होईल. या रेल्वेला १५ बोगी असतील.
ट्रॅव्हल्सचे दर कमी होतील
ट्रॅव्हल्स बसने ५ तासात पुण्याला जाता येते. रेल्वेने अधिक वेळ जातो. ९० टक्के ट्रॅव्हल्स या रात्रीच धावतात. नव्या रेल्वेमुळे ट्रॅव्हल्सचे तिकीट दर कमी होऊ शकतील.
- राजन हौजवाला, अध्यक्ष, बस ओनर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स एजंट वेलफेअर असोसिएशन
पुणे मार्गावरील बस, ट्रॅव्हल्सची संख्या:
ट्रॅव्हल्स-४७
मध्यवर्ती बसस्थानकातून धावणाऱ्या बस- ३६
पुणे विभागाच्या बसफेऱ्या-३६
शिवनेरी बस-६
तिकीट दर किती ?
ट्रॅव्हल्सचे तिकीट दर - ५०० ते ८०० रुपये
रेल्वेचे तिकीट दर- स्लीपर २६५ रुपये, थर्ड एसी ७०५ रुपये, सेकंड एसी १ हजार रुपये, फर्स्ट एसी १ हजार ६७५ रुपये.
पुण्याला जाण्यास लागणारा वेळ:
बसने लागणारा वेळ- किमान ५ तास. (पुण्यातील वाहतूक कोंडीने अनेकदा वेळ वाढतो)
रेल्वेने लागणारा वेळ- ९ तास