मुद्रा योजनेचे कर्ज तर सोडाच, अर्जही मिळेनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2017 12:07 AM2017-12-09T00:07:29+5:302017-12-09T00:07:35+5:30
‘गरजेनुसार कर्ज, अपेक्षेनुसार प्रगती’ अशा जाहिराती प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या केल्या जात आहेत. प्रत्यक्षस्थिती मात्र, वेगळीची आहे. मुद्रा कर्ज सोडाच; पण अर्जही देण्यास बँकेचे अधिकारी टाळाटाळ करीत आहेत. यामुळे बेरोजगार युवक बँकांमध्ये खेटे मारून वैतागले आहेत. काहींनी तर आता मुद्रा कर्ज घेण्याचा नादही सोडून दिला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : ‘गरजेनुसार कर्ज, अपेक्षेनुसार प्रगती’ अशा जाहिराती प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या केल्या जात आहेत. प्रत्यक्षस्थिती मात्र, वेगळीची आहे. मुद्रा कर्ज सोडाच; पण अर्जही देण्यास बँकेचे अधिकारी टाळाटाळ करीत आहेत. यामुळे बेरोजगार युवक बँकांमध्ये खेटे मारून वैतागले आहेत. काहींनी तर आता मुद्रा कर्ज घेण्याचा नादही सोडून दिला आहे. उल्लेखनीय, म्हणजे यावर निगराणी ठेवणा-या अग्रणी बँकेकडेही जिल्हानिहाय व शाखानिहाय कर्जवाटप केल्याची माहिती उपलब्ध नसल्याचे सत्य समोर आले आहे.
शासनाच्या विविध योजनांतर्गत बेरोजगारांना रोजगारासाठी जिल्हा उद्योग केंद्र, विविध महामंडळे, बँकांमधून कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. मात्र, तिथून कर्जाची रक्कम लवकर हाती पडत नव्हती. हा तिढा सोडविण्यासाठी पंतप्रधान मुद्रा कर्ज योजना जाहीर करण्यात आली. कमीत कमी वेळात कर्ज पुरवठा होऊन बेरोजगारांनी उद्योग-व्यवसाय सुरू करावा हा त्याच्यामागील हेतू होय. या शिशू योजनेंंतर्गत ५० हजारांपर्यंत, किशोर योजनेंतर्गत ५० हजार ते ५ लाखांपर्यंत, तर तरुण योजनेंतर्गत ५ लाखांपासून १० लाखांपर्यंत कर्ज दिले जाते. राष्ट्रीयीकृत व खाजगी बँकांवर मुद्रा कर्ज देण्याची जबाबदारी टाकण्यात आली आहे. दोन वर्षांच्या कालावधीत बँकांनी मुद्रा कर्ज पुरवठा केला; पण नंतर कर्ज सोडाच; पण अर्जही देण्यास टाळाटाळ केली जाऊ लागली. अग्रणी बँक असलेल्या बँक आॅफ महाराष्ट्राकडे सर्व बँकांनी मुद्रा कर्ज वाटपासंदर्भात माहिती देणे अपेक्षित आहे. मात्र, अन्य बँका या अग्रणी बँकेला माहिती कळवत नसल्याचे आढळून आले आहे. यासंदर्भात नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात मुद्रा बँक योजना समन्वय समितीची बैठक झाली. या बैठकीत बँकेचे अधिकारी औरंगाबाद जिल्ह्यातील किती बँकांनी किती मुद्रा कर्ज वाटप केले याची माहिती देऊ शकले नाहीत. बँकांना शाखानिहाय मुद्रा बँक योजना उद्दिष्टपूर्तीचा अहवाल मागवून तो पुढील बैठकीत सादर करावा, असे निर्देश उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे यांनी या बैठकीत दिले. यासंदर्भात आमचे प्रतिनिधीने अग्रणी बँकेचे मुख्य व्यवस्थापक प्रदीप कुतवळ यांची भेट घेतली असता त्यांनी औरंगाबाद जिल्ह्याऐवजी संपूर्ण महाराष्ट्रात मुद्रा कर्ज वाटपाची एकूण आकडेवारी सांगितली. कारण, त्यांच्याकडेही जिल्ह्यातील बँकांच्या शाखानिहाय माहिती उपलब्ध नव्हती. विशेष म्हणजे आता कर्ज वाटपाचे उद्दिष्टपूर्ण झाले असे सांगत बँकांनी मुद्रा कर्ज वाटप करणेच बंद केले आहे. आकडेवारी दाखवणार कुठून, अशीच परिस्थिती राहिली तर ज्या हेतूने प्रधानमंत्री मुद्रा योजना सुरू केली त्याच उद्देशालाच बँकांडून हरताळ फासला जातो की काय, अशी शंका नागरिकांच्या मनात निर्माण होऊ लागली आहे.