महिलेला ब्लॅकमेल करून पैसे उकळले; दोन वृद्धांविरोधात गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 01:36 AM2018-04-03T01:36:44+5:302018-04-03T15:50:25+5:30
कामासाठी घरी बोलावलेल्या महिलेला चहातून गुंगीचे औषध पाजून बेशुद्ध केल्यानंतर तिचा अश्लील व्हिडिओ तयार करून दोन वृद्ध चार महिन्यांपासून तिला ब्लॅकमेल करीत असल्याचा खळबळजनक प्रकार सोमवारी समोर आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : कामासाठी घरी बोलावलेल्या महिलेला चहातून गुंगीचे औषध पाजून बेशुद्ध केल्यानंतर तिचा अश्लील व्हिडिओ तयार करून दोन वृद्ध चार महिन्यांपासून तिला ब्लॅकमेल करीत असल्याचा खळबळजनक प्रकार सोमवारी समोर आला. याप्रकरणी क्रांतीचौक पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा नोंदविला. दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांची कसून चौकशी सुरू केली आहे. यातील एक आरोपी एस. टी. महामंडळातील निवृत्त अधिकारी आहे.
नारळीबागेतील रहिवासी २२ वर्षीय पीडिता कामाच्या शोधात होती. ओळखीच्या एका ६० वर्षीय वृद्ध वॉचमनने खोकडपुरा परिसरातील राधामोहन कॉलनीत एकट्या राहणाऱ्या वृद्धाला घरकामासाठी बाई पाहिजे असल्याचे सांगितले. त्यामुळे नोव्हेंबर २०१७ मध्ये ती वॉचमनसोबत त्या वृद्धाच्या घरी गेली. पाठक नावाच्या ६८ वर्षीय घरमालकाने स्वयंपाक आणि धुणी-भांड्याचे काम असल्याचे सांगितले. त्यानंतर दरमहा वेतनावर त्यांची चर्चा झाली. त्यांच्यापैकी एकाने तिला चहा करून आणला. हा चहा पिल्यानंतर पीडितेला चक्कर येऊ लागली. ही बाब तिने घरमालक वृद्धाला सांगितली असता त्याने उन्हामुळे होत असेल. तू काही वेळ आराम कर आणि नंतर घरी जा, असे सांगितले. त्यानंतर काही मिनिटातच तिला गुंगी आली. दुपारी २ वाजता तिला जाग आली असता तिने कामावर यायचे अथवा नाही, हे तुम्हाला नंतर सांगते, असे म्हणून ती तेथून निघून गेली. सात ते आठ दिवसांनंतर घरमालकाने पीडितेला फोन करून घरी बोलावले. पीडिता तेथे गेल्यानंतर आरोपीने तिला व्हिडिओ क्लीप दाखविली. ही क्लीप तुझ्या पतीला आणि अन्य लोकांना दाखवून तुझी बदनामी करीन, अशी धमकी देऊन आरोपींनी तिच्याकडे पैशाची मागणी केली.
पीडितेच्या म्हणण्यानुसार प्रथम ५ हजार, ८ हजार, १५ हजार आणि ३५ हजार रुपये असे करून सुमारे दीड ते दोन लाख रुपये दिले. हे पैसे देण्यासाठी तिने स्वत:च्या गळ्यातील दागिने मोडले. एवढेच नव्हे तर पीडितेने गल्लीतील ओळखींच्या महिलांच्या सोन्याची पोत गहाण ठेवून आलेली रक्कमही आरोपीला दिली. हे सर्व तिने पतीपासून लपवून केले. आता तिच्याकडे त्याला देण्यासाठी पैसेच नसल्याने आरोपीने तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. यामुळे पीडितेने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. रविवारी रात्री तिने पतीला ही सर्व घटना सांगितली. त्यानंतर हे दाम्पत्य ठाण्यात आले आणि त्यांनी तक्रार नोंदविली. सहायक फौजदार एजाज शेख तपास करीत आहे.