पैशासाठी मजूराला डांबले, अपहरणकर्त्यास अटक
By Admin | Published: April 27, 2017 09:41 PM2017-04-27T21:41:47+5:302017-04-27T21:41:47+5:30
मजुराचे अपहरण करुन जिंतूर तालुक्यातील एका घरात त्यांना डांबून ठेवून पैशाची मागणी करणाऱ्या अपहरणकर्त्यास मुकुंदवाडी
ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 27 - मजुराचे अपहरण करुन जिंतूर तालुक्यातील एका घरात त्यांना डांबून ठेवून पैशाची मागणी करणाऱ्या अपहरणकर्त्यास मुकुंदवाडी पोलिसांनी मोठ्या शिताफिने पकडले आणि मजूराची सुटका केली.
विष्णू ससे (३२,रा. पाचोरा, ता. जिंतूर, जि. परभणी) असे आरोपीचे नाव आहे.
ऋषिकेश देशमुख हे औरंगाबादेतील जयभवानीनगर येथे पत्नी आणि मुलांसह राहतात. ते मोलमजूरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात. आरोपी आणि तक्रारदार एकाच तालुक्यातील असल्याने ते एकमेकांच्या परिचयाचे आहेत. त्यांच्यात आर्थिक व्यवहारही होत असत. दोन ते तीन वर्षापूर्वी ऋ षिकेश यांनी तक्रारदार यांच्याकडून ५० हजार रुपये उसने घेतले होते. आर्थिक अडचणीमुळे ते आरोपीला रक्कम परत करू शकले नाही. आरोपीकडून मात्र त्यांच्याकडे पैशासाठी सारखा तगादा सुरू होता.
दरम्यान २२ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास आरोपी ससे देशमुखच्या घरी गेला. चहा पिऊन येऊ, असे म्हणून देशमुख यांना तो सोबत घेऊन गेला. देशमुख यांना सोबत घेऊन तो चक्क गावी गेला. तेथील एका शेतातील घरात त्याने देशमुख यांना डांबून ठेवून जबर मारहाण केली. जोपर्यंत पाच लाख रुपये देत नाही, तोपर्यंत तुझी सुटका होणार नाही, असा दम आरोपींनी दिला. ससेसोबत गेलेला पती घरी न परतल्याने त्यांची पत्नी चिंतीत होती. पैशाची व्यवस्था करण्याच्या बहाण्याने देशमुख यांनी २५ एप्रिल रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास पत्नी शालिनी यांच्याशी संपर्क साधला. पैशासाठी ससेने मारहाण करून गावातील एका घरात डांबून ठेवल्याचे देशमुख यांनी पत्नीला सांगितले. ही बाब समजल्यानंतर शालिनी यांनी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात आरोपी ससेविरूद्ध तक्रार नोंदविली.
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे, सहायक आयुक्त माणिक बाखरे, पोलीस निरीक्षक अशोक मुदीराज यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बनसोड, कर्मचारी विजय चौधरी, प्रकाश सोनवणे, वाहनचालक खरात, गुन्हेशाखेचे संदीप पाटील आणि भोसले यांनी बुधवारी सायंकाळी आरोपीचे गाव गाठून तेथे त्याचा शोध सुरू केला.
चौकट
अमिषाने अडकला जाळ्यात
आरोपीला पकडण्यासाठी उपनिरीक्षक बनसोड यांनी जिंतूर पोलिसांच्या मदतीने आरोपीला दोन ते अडिच लाख रुपयांत तडजोड करून देशमुखची सुटका करण्याची तयारी त्यांच्या पत्नीची असल्याचे कळविले. त्यानंतर आरोपी ससे देशमुख यांना घेऊन आला. देशमुख सुखरुप असल्याचे पाहताच पोलिसांनी आरोपीला पकडले.