विद्यापीठात पीएच.डी. साठी पैसे; प्रकुलगुरूंनी कारवाई करत अधिकाऱ्यांच्या केल्या बदल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 05:56 PM2018-08-25T17:56:45+5:302018-08-25T17:57:58+5:30
पीएच. डी. विभागातील अधिकाऱ्याने अभियांत्रिकीत पीएच.डी. करणाऱ्या एका विद्यार्थ्याला दीड लाख रुपये मागितल्याची तक्रार प्रकुलगुरूंकडे आली होती.
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पीएच. डी. विभागातील अधिकाऱ्याने अभियांत्रिकीत पीएच.डी. करणाऱ्या एका विद्यार्थ्याला दीड लाख रुपये मागितल्याची तक्रार प्रकुलगुरूंकडे आली होती. यावरून प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांनी दोन अधिकारी आणि एका कर्मचाऱ्याची तडकाफडकी बदली केली. याविषयी ‘लोकमत’ने २३ आॅगस्टच्या अंकात भंडाफोड केला होता.
अभियांत्रिकी विषयात पीएच. डी. करीत असलेल्या एका विद्यार्थ्याचा शोधप्रबंध दोन बहि:स्थ परीक्षकांकडे पाठविणे, या परीक्षकांकडून तात्काळ अहवाल मागविणे, कागदपत्रे दाखल करून घेणे, अहवालानंतर मौखिक परीक्षेसाठीची पूर्ण प्रक्रिया पार पाडणे, या कामासाठी पीएच. डी. विभागाच्या कक्ष अधिकारी आणि कंत्राटी कर्मचाऱ्याने दीड लाख रुपये मागितल्याची तक्रार विद्यार्थ्याने केली होती. यावर प्रकुलगुरूंनी तात्काळ चौकशीसाठी तीन सदस्यीय समिती स्थापन केली होती, तसेच विद्यापीठाचा वर्धापन दिन होताच शुक्रवारी पीएच. डी. विभागातील कक्ष अधिकारी व्यंकट खैरनार, आर. आर. चव्हाण यांच्यासह कर्मचारी गणेश मानपुरे यांची त्या विभागातून इतरत्र बदली केली.
पीएच. डी. विभागात कक्ष अधिकारी म्हणून बी. बी. वाघ आणि एच. एस. हिवराळे यांना पदभार देण्यात आला आहे. याप्रकरणी नेमलेल्या चौकशी समितीने शुक्रवारी (दि.२४) विद्यार्थ्याने केलेल्या तक्रारीची पडताळणी केली, तसेच विद्यार्थ्याने नाव घेतलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्याचे जबाबही घेण्यात येणार आहेत.
काही बदल केले आहेत
विद्यार्थ्याने केलेल्या तक्रारीची तीव्रता पाहून संबंधित विभागात काही बदल केले आहेत. याविषयी चौकशी समिती काम करीत आहे. त्यांनी अहवाल दिल्यानंतरच कडक कारवाई करण्याविषयी निर्णय विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत ठेवण्यात येईल. यातही विद्यार्थी हिताला प्राधान्य असणार आहे.
-डॉ. अशोक तेजनकर, प्रकुलगुरू