पैशाचे पाणी ! मराठवाड्यात लागतात विहीर अधिग्रहणासाठी रोज २२ लाख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 02:38 PM2019-05-27T14:38:06+5:302019-05-27T14:41:42+5:30
बीडमध्ये सर्वाधिक विहिरी प्रशासनाच्या ताब्यात
- विकास राऊत
औरंगाबाद : मराठवाड्यात दिवसाकाठी सुमारे २२ लाख रुपये रोज विहीर अधिग्रहणासाठी मोजावे लागत आहेत. पाण्यासाठी पैसा मोजून दुष्काळावर मात केली जात आहे. गेल्या आठवड्याच्या अखेरीस ५ हजार ३२१ विहिरी विभागात अधिग्रहित करण्याचा आकडा होता. वेळेत मान्सूनचे आगमन झाले नाही, तर विहिरी अधिग्रहणाचा आकडा वाढण्याची शक्यता प्रशासकीय सूत्रांनी वर्तविली आहे. ४०० रुपये रोज एका विहिरीसाठी अधिग्रहणासाठी प्रशासकीय मान्यतेने देण्यात येतो. विहिरींचे अधिग्रहण कमी-अधिक प्रमाणात होते.
मे महिन्याच्या सुरुवातीपासून आजवर साधारणत: ३ कोटींच्या आसपास रक्कम विहिरींच्या अधिग्रहणासाठी लागली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मे महिन्याच्या सुरुवातीस झालेल्या आॅडिओ ब्रीज (संवाद सेतू)मध्ये बहुतांश सरपंचांकडून विहीर अधिग्रहणाची रक्कम वाढवून देण्याची मागणी आली आहे. शासनाने या मागणीचा विचार केला, तर अधिग्रहणाचे दिवसाकाठी ४०० रुपयांचे दर वाढण्याची शक्यता आहे. ३ हजारांच्या पुढे टँकरचा आकडा गेला असून, विभागातील २५ टक्के लोकसंख्या टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहे. यावरून यंदाचा दुष्काळ किती भीषण आहे, याचा अंदाज येतो आहे. विभागातील २,३०० गावे आणि ८०० वाड्यांवर पाणीटंचाई आहे. ८ हजार ५५० पैकी २,३०० गावे म्हणजे २५ ते २७ टक्के ग्रामीण भाग दुष्काळाने होरपळल्याचे स्पष्ट आहे.
बीडमध्ये सर्वाधिक विहिरी ताब्यात
औरंगाबाद जिल्ह्यात ५३२ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. जालना ६६२, परभणी ३६०, हिंगोली ४४९, नांदेड ६७५, बीड ९५३, लातूर ८१८, उस्मानाबाद ८७२ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. बीड जिल्ह्यात सर्वाधिक ९५३ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.
जिल्हा विहिरींची संख्या अधिग्रहण रोजचा खर्च
औरंगाबाद ५३२ २ लाख १२ हजार ८००
जालना ६६२ २ लाख ६४ हजार ८००
परभणी ३६० १ लाख ४४ हजार
हिंगोली ४४९ १ लाख ७९ हजार ६००
नांदेड ६७५ २ लाख ७० हजार
बीड ९५३ ३ लाख ८१ हजार २००
लातूर ८१८ ३ लाख २७ हजार २००
उस्मानाबाद ८७२ ३ लाख ४८ हजार ८००
एकूण ५३२१ २१ लाख २८ हजार ४००