लाडक्या बहीणींच्या खात्यावर पैसे टाकण्याची प्रक्रिया तीन दिवसांत सुरू होणार: मुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2024 05:56 PM2024-08-02T17:56:46+5:302024-08-02T17:58:37+5:30
काही अंतरावरच शिवसेनेच्या तीन गटांनी तीन ठिकाणी सत्कार करण्यात आल्याने अंतर्गत वाद उघडपणे दिसून आले.
फुलंब्री : लाडक्या बहिणीच्या खात्यावर येत्या तीननंतर पंधराशे रुपये टाकण्याची प्रक्रिया सुरुवात होणार असल्याची माहिती देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व बहिणींना शुभेच्छा दिल्या. माहिती दिली ते शुक्रवारी दुपारी तीन वाजता पाल फाटा येथे काहीकाळ थांबले होते. दरम्यान, काही अंतरावरच शिवसेनेच्या तीन गटांनी तीन ठिकाणी सत्कार करण्यात आल्याने अंतर्गत वाद उघडपणे दिसून आले.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे छत्रपती संभाजीनगरहून बायकार फुलंब्री मार्ग सिल्लोड येथे महिला सशक्तीकरण योजनेच्या शुभारंभ करिता निघाले. दुपारी जळगाव महामार्गाने जात असताना दुपारी तीन वाजेच्या दरम्यान पाल फाटा येथे काहीकाळ थांबले होते. यावेळी माजी सभापती किशोर बलांडे यांच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. येथे मोठ्या प्रमाणात महिला हजर होत्या. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, प्रथम लाडक्या बहिणींना माझ्या शुभेच्छा. येत्या तीन दिवसांपासून त्यांच्या खात्यावर १५०० रुपये टाकण्यास सुरुवात केली जाणार आहे. तसेच लाडका भाऊ योजनाही लवकर अंमलात येणार असल्याची माहिती देखील मुख्यमंत्र्यांनी दिली. दरम्यान, आदर्श पथसंस्थेमध्ये पैसे अडकलेल्या जातेगाव येथील शेकडो नागरिकांनी मुख्यमंत्र्यांना भेटून निवेदन दिले. या संदर्भात माझी मिटिंग झालेली आहे त्याचा प्रश्न मार्गी लावला जाईल असे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिले.
शिवसेनेच्या तीन गटाकडून तीन ठिकाणी सत्कार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जळगाव महामार्गावरून सिल्लोड ला जात असताना पाल फाटा येथे केवळ दीडशे फुटाच्या अंतरावर दोन गटांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी मुख्यमंत्री शिंदे यांचा सत्कार आयोजित केला. पाल गावात जाणाऱ्या रस्त्यावर माजी सभापती चंद्रकांत जाधव यांच्यावतीने सत्कार करण्यात आला तर दुसरा सत्कार माजी सभापती किशोर बलांडे यांच्यावतीने काही अंतरावर करण्यात आला. त्यानंतर फुलंब्री टी पॉइंटवर शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र ठोंबरे ,जमीर पठान ,राउफ कुरेशी यांनी वेगळा सत्कार केला. विशेष म्हणजे, या तिन्ही सत्कारप्रसंगी पालकमंत्री अब्दुल सत्तार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत होते. आतापर्यंत अंतर्गत सुरु असलेला बेबनाव या कार्यक्रमातून सर्वाना दिसून आल्याची चर्चा यावेळी झाली.