मंकीपॉक्सचे सध्या 'नो टेन्शन'; डॉ. रमण गंगाखेडकरांनी सांगितला कोरोना-मंकीपॉक्समधील फरक
By संतोष हिरेमठ | Published: July 26, 2022 03:06 PM2022-07-26T15:06:59+5:302022-07-26T15:08:34+5:30
'कोरोना जसा पसरला त्या प्रमाणात मंकीपाॅक्स पसरण्याची सध्यातरी शक्यता नाही. त्यामुळे याला फार घाबरण्याची गरज नाही'
औरंगाबाद : देशात मंकीपाॅक्सचे आजपर्यंत केवळ चार रुग्ण आढळून आले आहे. जेव्हा एका व्यक्तीपासून अनेक व्यक्तीला लागण होण्याची शक्यता असते तेव्हा घाबरण्याची गरज असते. कोरोना जसा पसरला त्या प्रमाणात मंकीपाॅक्स पसरण्याची सध्यातरी शक्यता नाही. त्यामुळे याला फार घाबरण्याची गरज नाही, असे ‘आयसीएमआर’चे माजी साथरोग आणि संसर्गजन्यरोग विभागप्रमुख पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर म्हणाले. एमजीएम इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सच्या पदवीदान समारंभानिमित्त औरंगाबादेत आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
दिल्लीत मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळून आल्यानंतर देशातील या आजाराच्या बाधितांची संख्या आता चारवर पोहोचली आहे. दिल्लीतील रुग्ण ३४ वर्षे वयाचा असून, त्याने कधीही विदेश प्रवास केलेला नाही. त्याने काही दिवसांपूर्वी हिमाचल प्रदेशमधील मनाली येथे एका लग्नाच्या आदल्या दिवशी झालेल्या बॅचलर पार्टीला हजेरी लावली होती. दिल्लीतील या बाधिताला लोकनायक जयप्रकाश रुग्णालयात विलगीकरणात ठेवले आहे. या रुग्णाची प्रकृती आता सुधारत आहे. देशातील मंकीपॉक्सचे पहिले तीन रुग्ण केरळमध्ये सापडले होते.
दरम्यान, कोरोना नंतर मंकीपोक्समुळे नागरिक चिंतेत आहेत. मात्र, हा आजार आला तर रुग्णालयात भरती होऊन मोठे उपचार करावे लागतील, मृत्यू होतील, असे वाटते. परंतु यात केवळ ०.१ टक्के मृत्यूचा धोका आहे. रुग्णालयात येणारे रुग्ण केवळ आयसोलेट होण्यासाठी भरती होतील, असे मत डॉ. रमण गंगाखेडकर यांनी व्यक्त केले. तसेच कोरोना जसा पसरला त्या प्रमाणात मंकीपाॅक्स पसरण्याची सध्यातरी शक्यता नाही. त्यामुळे याला सध्यातरी फार घाबरण्याची गरज नाही, असा विश्वासही डॉ. गंगाखेडकर यांनी व्यक्त केला.
WHO ने बारकाईने लक्ष ठेवण्याचे केले आवाहन
दरम्यान, डब्ल्यूएचओचे दक्षिण-पूर्व आशियाच्या प्रादेशिक संचालिक डॉ. पूनम खेत्रपाल सिंह म्हणाल्या की, मंकीपॉक्सची प्रकरणे पुरुषांशी संबंध ठेवणाऱ्यांमध्ये वाढत आहेत. ज्या देशांमध्ये यापूर्वी एकही रुग्ण आढळला नव्हता, त्या देशांमध्येही आता मंकीपॉक्सचा प्रसार वेगाने होत आहे. रोगाची बहुतेक प्रकरणे पुरुषांसोबत लैंगिक संबंध ठेवणाऱ्यांमध्ये दिसत आहेत. WHO ने दक्षिण-पूर्व आशिया क्षेत्रातील देशांना मंकीपॉक्सवर बारकाईने लक्ष ठेवण्याचे आणि योग्य उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे.