मराठवाड्यात १७ जूननंतर मान्सून होणार सक्रिय; हवामानातील बदलाने पावसाची दडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 12:31 PM2018-06-12T12:31:54+5:302018-06-12T12:33:29+5:30
खरीप हंगामातील पेरणीस सज्ज असलेल्या शेतकऱ्यांना पावसाने दडी दिल्याने आणखी पाच ते सहा दिवस प्रतीक्षा करावी लागण्याची चिन्हे आहेत
औरंगाबाद : मान्सूनपूर्व पावसाने जूनच्या सुरुवातीलाच जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली. मात्र, खरीप हंगामातील पेरणीस सज्ज असलेल्या शेतकऱ्यांना पावसाने दडी दिल्याने आणखी पाच ते सहा दिवस प्रतीक्षा करावी लागण्याची चिन्हे आहेत.
यंदाच्या मोसमात ९७ टक्के पावसाचा अंदाज स्कायमेटसह भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यातच नियोजित वेळेप्रमाणे मान्सून अंदमान, निकोबारमार्गे देशात दाखल झाला. मराठवाड्यासह काही भागांत मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरीही लावली. मान्सून वेळेत दाखल होण्याची शक्यता असतानाच अचानक औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातील काही भागात पावसाने दडी मारली. पावसासाठी हवामानातील योग्य बदल होत नसल्याने अनेक ठिकाणी पाऊस लांबला आहे. वातावरणातील बदल आणि पावसासाठी योग्य होणारी परिस्थिती कमकुवत झाल्याने पाऊस लांबला आहे, तर नांदेड, परभणी, हिंगोली, बीड आदी जिल्ह्यांतही १२ ते १६ जून या काळात पावसाची शक्यता कमीच आहे.
हवामानातील बदलांमुळे या जिल्ह्यांमध्येही १६ जूननंतरच मान्सून खऱ्या अर्थाने मराठवाड्यात सक्रिय होणार असल्याचे हवामानतज्ज्ञांनी सांगितले. मराठवाड्यात काही ठिकाणी कपाशीची लागवड झाली असली तरी सोयाबीन, मूग, तूर, बाजरी आदी पिकांची पेरणी पाऊस लांबल्याने खोळंबली आहे. चांगला पाऊस झाल्यानंतरच पेरणी सुरु करता येणार आहे. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यासह मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मान्सूनसाठी आठवडाभर प्रतीक्षा करावी लागणार आहे.
चांगला पाऊस असेल तरच पेरणी...
पाऊस चांगला असेल तरच शेतकऱ्यांनी पेरणी करावी. अन्यथा प्रतीक्षा करावी, असा सल्ला कृषितज्ज्ञांनी दिला आहे. पावसाचे प्रमाण कमी असेल आणि शेतकऱ्यांनी पेरणी केल्यास ती वाया जाण्याची भीती अधिक असते. दुबार पेरणीचे संकट येऊ नये, यासाठी शेतकऱ्यांनी चांगला पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी, असे कृषितज्ज्ञांनी म्हटले आहे.
सध्या पावसा योग्य वातावरण नाही
मराठवाड्यात १० किंवा ११ जून रोजी मान्सून दाखल व्हायला हवा होता. मात्र, औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यांत पावसायोग्य हवामान नसून, मान्सूनसाठीचे अनुकूल वातावरण १६ जूननंतर असेल. त्यानंतर पावसाची समाधानकारक हजेरी लागेल.
- श्रीनिवास औंधकर, संचालक, खगोलशास्त्र विभाग, एमजीएम, औरंगाबाद