कडक निर्बंधांमध्ये रमजान महिन्याला होणार सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:04 AM2021-04-11T04:04:12+5:302021-04-11T04:04:12+5:30

औरंगाबाद : मागील वर्षी कडक लॉकडाऊनमध्ये पवित्र रमजान महिना गेला. मुख्य ईदगाहमध्ये ईदची नमाजही अदा करता आली नाही. याचे ...

The month of Ramadan will begin with strict restrictions | कडक निर्बंधांमध्ये रमजान महिन्याला होणार सुरुवात

कडक निर्बंधांमध्ये रमजान महिन्याला होणार सुरुवात

googlenewsNext

औरंगाबाद : मागील वर्षी कडक लॉकडाऊनमध्ये पवित्र रमजान महिना गेला. मुख्य ईदगाहमध्ये ईदची नमाजही अदा करता आली नाही. याचे शल्य मुस्लिम बांधवांमध्ये असताना यंदाही रमजान महिना लॉकडाऊनमध्ये जाणार की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनामुळे शासनाने निर्बंध टाकले असले तरी रात्री विशेष नमाजासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी मुस्लिम संघटनांकडून जोर धरत आहे.

चंद्रदर्शन झाल्यानंतर १४ एप्रिलपासून पवित्र रमजान महिन्याला सुरुवात होण्याची शक्यता आहे. मागील वर्षी मार्च महिन्यातच लॉकडाऊन लावण्यात आले होते. मे महिन्यात मुस्लिम बांधवांनी पाच वेळा घरातच नमाज अदा केली. महिनाभराचे उपवास ठेवल्यानंतर मुस्लिम बांधव शहरातील वेगवेगळ्या ईदगाहमध्ये जाऊन ईदची मुख्य नमाज अदा करतात. मागील वर्षी कोरोनामुळे मुस्लिम बांधवांनी ईदची मुख्य नमाज ईदगाहमध्ये जाऊन अदा केली नाही. यंदाही मार्च महिना सुरू होताच कोरोनाचा उद्रेक सुरू झाला आहे. शहर आणि ग्रामीण भागात जवळपास दीड हजार रुग्ण दररोज आढळून येत आहेत. चिंताजनक बाब म्हणजे घाटी आणि खाजगी रुग्णालयांमध्ये चोवीस तासांमध्ये पंचवीस ते तीस नागरिकांचा मृत्यू होत आहे. राज्यात सर्वत्र अशीच परिस्थिती असल्यामुळे राज्य शासनाने कडक निर्बंध जाहीर केले. सर्व धार्मिक स्थळे बंद करण्यात आली आहेत. पवित्र रमजान महिना लॉकडाऊनमध्येच जाणार की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. लॉकडाऊन मुद्द्यावर मुस्लिम बांधवांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

तरावीह पढण्याची परवानगी द्या

दिवसभर उपवास ठेवल्यानंतर रात्री शहरातील विविध मशिदींमध्ये पवित्र धर्मग्रंथाचे वाचन नमाजमध्ये करण्यात येते. रात्रीच्या तरावीहसाठी परवानगी द्या, अशी मागणी शहरातील मुस्लिम संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी शासनाकडे यासंदर्भात मागणी केली. मात्र, शासनाने यासंदर्भात कोणताही निर्णय घेतलेला नाही.

व्यापाऱ्यांनी घेतला धसका

मुस्लिम बांधव रमजान महिन्यात मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. औरंगाबाद शहरात कोट्यवधी रुपयांची उलाढाल रमजान ईदच्या पूर्वी होते. रमजान महिन्यात व्यापारी मोठ्या प्रमाणात माल ठेवतात. मागील वर्षी व्यापाऱ्यांचा एक सीजन बुडाला. यंदाही मागील वर्षात सारखीच परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी चांगलाच धसका घेतला आहे.

Web Title: The month of Ramadan will begin with strict restrictions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.