महिन्याची ‘वेटिंग’ आली १५ दिवसांवर
By Admin | Published: January 1, 2017 11:49 PM2017-01-01T23:49:21+5:302017-01-01T23:51:38+5:30
बीड : रबी हंगामातील पिके ऐन बहरात असतानाच रोहित्रांच्या बिघाडात मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती.
बीड : रबी हंगामातील पिके ऐन बहरात असतानाच रोहित्रांच्या बिघाडात मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. परिणामी, पिके सुकू लागली असतानाच मुख्य कार्यालयाकडून शंभर रोहित्रांचा पुरवठा झाल्याने जिल्ह्यातील परिस्थिती आटोक्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांसह अधिकारी, कर्मचाऱ्यांनादेखील दिलासा मिळाला आहे.
रबी हंगाम सुरू होताच गेल्या चार वर्षांपासून बंद असलेले कृषी पंप अचानक सुरू झाल्याने रोहित्रांवरील भार वाढला होता. त्यामुळे बिघडलेल्या रोहित्रांची संख्या ५०० वर गेली होती. त्वरित रोहित्र मिळण्याकरिता शेतकऱ्यांचे खेटे विभागीय कार्यालयाकडे वाढले होते. दिवसाकाठी २०-२५ रोहित्रांत बिघाड होत असून, केवळ २-४ रोहित्रे दुरुस्ती होऊन मिळत असल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांची दमछाक होत होती. अधिकाऱ्यांच्या आश्वासनाला वैतागून अनेक वेळा वैतागून शेतकरी आक्रमक झाल्याच्याही घटना घडल्या आहेत. मात्र, हिवाळी अधिवेशनाच्या वेळी पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी हा प्रश्न अधिक गांभीर्याने मांडला होता. शिवाय, येथील अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही मुख्य कार्यालयाकडे वेळोवेळी पाठपुरावा केल्याने २०० रोहित्रे मंजूर झाली होती. यापैकी १०० रोहित्रे मिळाली असून, अंबाजोगाई व बीड विभागाकरिता प्रत्येकी ५० रोहित्रे दिल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. रोहित्रांकरिता २ कोटी रुपयांचा प्रस्ताव प्रशासनातर्फे मुख्य कार्यालयाकडे गेला असून, आणखी रोहित्रे मिळण्याची आशा आहे. (प्रतिनिधी)