क्रिकेट खेळण्यासाठी जाताना काळाचा घाला; टेम्पोला धडकल्याने मोपेडस्वार तरुणाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2023 08:22 PM2023-01-14T20:22:57+5:302023-01-14T20:23:13+5:30
वेदशास्त्रात निपुण तरुणास क्रिकेट खेळण्याचा छंद होता, मित्रांसोबत जाताना झाला अपघात
फुलंब्री (औरंगाबाद) : क्रिकेट खेळण्यासाठी मोपेडवरून जात असताना टेम्पोला पाठीमागून धडकून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना आज सायंकाळी साडेचार वाजेच्या दरम्यान खुलताबाद रस्त्यावर घडली. अभिषेक रमेश पराशर ( २३ ) असे मृत तरुणाचे नाव आहे.
अभिषेक रमेश पराशर हा आपला मित्र ऋषिकेश रत्नाकर जोशी याच्या सोबत आज सायंकाळी खुलताबाद रस्त्यावर देवगिरी कारखाना नजीक असलेल्या मैदानावर क्रिकेट खेळण्यासाठी मोपेडवरून जात होता. दरम्यान, रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या टेम्पोवर ( एमएच २१ बीएच १७१२ ) मोपेड धडकली. टेम्पोच्या पत्रा लागल्याने अभिषेक पराशर गंभीर जखमी झाला. त्याला फुलंब्री ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान अभिषेकचा मृत्यू झाला. अभिषेक वेदशास्त्र निपुण होता. क्रिकेट खेळण्याचा छंद असल्याने खुलताबाद मार्गावर असलेल्या मैदानावर तो दररोज मित्रांसोबत सोबत जात असे.