राज्यातील बारमाही नद्यांकाठीच ‘ताम्रपाषाण’ युगातील २२५ पेक्षा अधिक लोकवसाहती उजेडात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 02:20 PM2019-01-11T14:20:13+5:302019-01-11T14:20:44+5:30
‘महाराष्ट्रातील ताम्रपाषाणकालीन संस्कृती’या विषयावर डॉ. माने यांनी मांडणी केली.
औरंगाबाद : ज्या नद्यांना बारमाही पाण्याचा साठा उपलब्ध आहे. अशा नद्यांकाठीच ताम्र पाषाण युगात वसाहती वसल्या, असे प्रतिपादन ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जी. के. माने यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील इतिहास विभागाच्या वस्तुसंग्रहालयाच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित डॉ. आर. एस. गुप्ते व्याख्यानमालेला गुरुवारी सुरुवात झाली. अध्यक्षस्थानी प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर होते. यात ‘महाराष्ट्रातील ताम्रपाषाणकालीन संस्कृती’या विषयावर डॉ. माने यांनी मांडणी केली.
ते म्हणाले, गोदावरी नदी ही महाराष्ट्राची जननी आहे. या नदीच्या खोऱ्यातच संस्कृतीचा जन्म झाला. राज्यात ताम्रपाषाणकालीन संस्कृतीच्या २२५ पेक्षा अधिक लोकवसाहती उजेडात आल्या आहेत. त्यापैकी नगर जिल्ह्यातील दायमाबाद ही खऱ्या अर्थाने ताम्रपाषाणयुगाची सर्वसमावेशक अशी वसाहत आहे़ या संस्कृतीच्या लोकांचे वैशिष्ट्ये म्हणजे, ज्याठिकाणी नद्यांना बारमाही पाण्याचा साठा आहे आणि लगतच शेतीला उपयुक्त जमीन आहे. यातूनच वसाहतींचा विकास होत गेला. तापी, गिरणा, भीमा, कृष्णा, निरा, कऱ्हा, प्रवरा, गोदावरी आणि वैनगंगा नद्यांच्या खोऱ्यात ही संस्कृती अधिक वाढली. या वसाहतीचा १९५० साली जोव येथे शोध लागला. त्यानंतर नेवासे, प्रकाशे, बहाळ, सोनेगाव, आपेगाव, दायमाबाद, इनामगाव, वाकढी, कवठे, रंजाळे, तुळजापूर गढी, आडम, तारसा याठिकाणी उत्खनन करून ताम्रपाषाण संस्कृतीचे महाराष्ट्रातील स्थान निश्चित करता आल्याचे डॉ. माने यांनी सांगितले.
अध्यक्षीय समारोप डॉ. अशोक तेजनकर यांनी केला. इतिहास विभागप्रमुख डॉ. पुष्पा गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. गीतांजली बोराडे, कुमार भवर, डॉ. अमोल कुलकर्णी, प्रा.संजय पाईकराव, सुधीर बलखंडे, मच्छिंद्र चौधरी, प्रबुद्ध म्हस्के, सोनाली म्हस्के आदींनी परिश्रम घेतले.