औरंगाबादेतील बॉम्बशोधक पथकाला वर्षभरात ३०० हून अधिक कॉल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 07:20 PM2019-06-19T19:20:34+5:302019-06-19T19:22:32+5:30
औरंगाबादेतील बॉम्बशोधक पथक सदैव अलर्ट
औरंगाबाद : अति संवेदनशील शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औरंगाबाद शहरातील पोलीस आयुक्तालयांतर्गत असलेल्या बॉम्बशोधक आणि नाशक पथक (बीडीडीएस) पथकाला वर्षभरात सरासरी ३०० हून अधिक कॉल येत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. विशेष म्हणजे प्रत्येक कॉलनुसार संबंधित ठिकाण आणि बेवारस वस्तू आणि वाहनात स्फोटके असल्याचे समजूनच जवानांना तपासणी करावी लागते.
औरंगाबाद शहर हे अति संवेदनशील शहर म्हणून ओळखले जाते. या शहरात अनेकदा दहशतवाद्यांना दहशतवादविरोधी पथकाने अटक केली होती. २०१२ मध्ये हिमायतबागेत एटीएस आणि दहशतवादी यांच्यात जोरदार चकमक झाली होती. या चकमकीत एका अतिरेक्याचा खात्मा करण्यात आला होता. हिमायतबाग केसमधील आरोपींना न्यायालयाने शिक्षाही ठोठावली आहे.शिवाय चार महिन्यांपूर्वी एटीएसने कारवाई करीत घातपाताची तयारी करीत असलेल्या शहरातील आणि ठाण्याच्या मुंब्रा येथील काही संशयितांना अटक केली होती. जगप्रसिद्ध अजिंठा आणि वेरूळ लेण्यांचा वारसा असलेल्या ऐेतिहासिक औरंगाबाद जिल्ह्यात देश, विदेशातील पर्यटक आणि अति महत्त्वाच्या व्यक्ती सतत येतात. या पार्श्वभूमीवर औरंगाबाद बॉम्बशोधक आणि नाशक पथकाला सदैव अलर्ट राहावे लागते.
बेवारस वस्तू, बेवारस वाहन अथवा संशयास्पद वस्तू आढळल्यास त्याबाबतची माहिती तातडीने पोलिसांना कळविली जाते. पोलीसही त्या वस्तूमध्ये स्फोटके असण्याची शक्यता गृहीत धरून बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाला पाचारण करते. बॉम्बशोधक आणि नाशकचे अधिकारी कर्मचारी त्या वस्तूची यंत्राद्वारे आणि श्वानाकडून तपासणी करून घेते. त्या वस्तू अथवा वाहनामध्ये संशयास्पद काहीच नसल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्या वस्तूला स्पर्श क रते. अशा बेवारस वस्तू आणि वाहन उभे असल्याची माहिती अनेकदा स्वत: नागरिक बॉम्बशोधक आणि नाशक पथकाला फोन करून कळवितात. बऱ्याचदा पोलिसांकडूनही या पथकाला कॉल केला जातो. अशा प्रकारे सरासरी तीनशेहून अधिक कॉल बॉम्बशोधक आणि नाशक पथकाला वर्षभरात येतात.
स्फोटके आहेत, असे समजून तपासणी
एखाद्या ठिकाणी अनेक दिवसांपासून उभे बेवारस वाहन अथवा बेवारस वस्तूविषयी माहिती मिळाल्यानंतर बीडीडीएसचे पथक त्या वाहनात अथवा वस्तूमध्ये स्फोटके असल्याचे गृहीत धरूनच तपासणी करीत असते. अशावेळी सर्व प्रकारची खबरदारी पथकातील जवान आणि अधिकारी घेतात.