विद्यापीठात सापडलेल्या बाळाचा सांभाळ करण्यासाठी आले ४० हून अधिक जण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 06:07 PM2019-03-27T18:07:11+5:302019-03-27T18:09:06+5:30
बाळ टाकून जाणाऱ्या कुमारी मातेचा बेगमपुरा पोलिसांनी घेतला शोध
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परिसरात शुक्रवारी (दि.२२) बाळ फेकून देणाऱ्या कुमारी मातेला पोलिसांनी शोधून काढले. मित्रासोबत आलेल्या शारीरिक संबंधातून गर्भधारणा होऊन या बाळाचा जन्म झाल्याची कबुली तरुणीने दिली. समाजात होणारी बदनामी व घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे बाळ टाकून दिल्याचे तिने सांगितले. मात्र, बाळ आमच्याकडे द्या,आम्ही सांभाळतो, असे म्हणणारे ४० हून अधिक नागरिक पोलिसांकडे आले होते. नियमानुसार चिमुकल्याला अनाथाश्रमात दाखल करण्यात आले.
विद्यापीठातील वाय पॉइंटजवळील झुडपात दोन दिवसांचे नवजात पुरुष जातीचे अर्भक सापडले होते. याप्रकरणी अज्ञात मातेविरोधात गुन्हा नोंदवून बेगमपुरा पोलीस ठाण्याच्या निरीक्षक राजश्री आडे आणि कर्मचाऱ्यांनी तपास सुरू केला. चिमुकल्याला घाटीत दाखल करून त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तेव्हा बाळ ठणठणीत असल्याचे डॉक्टरांनी सांगतले. बाळाचा सांभाळ करण्यासाठी दोन महिला पोलीस, दोन महिला होमगार्ड आणि भारतीय समाज केंद्रातील प्रशिक्षित दोन आयांची मदत त्यांनी घेतली.
दुसरीकडे बाळाच्या मातेचा शोध सुरू असताना प्रथम घाटी रुग्णालयातून घटनेच्या तीन दिवस आधी प्रसूत झालेल्या मातांची नावे आणि माहिती त्यांनी जाणून घेतली, तेव्हा शहरातील एका २० वर्षीय कुमारी मातेने एका बाळाला जन्म दिल्याचे पोलिसांना समजले. पोट दुखते म्हणून दवाखान्यात गेलेली तरुणी नुकतीच घरी आल्याची माहिती खबऱ्याने पोलिसांना दिली. साध्या वेशातील पोलीस तिच्या घरी गेले तेव्हा तिने हंबरडा फोडत ते बाळ तिचेच असल्याचे सांगितले. अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या मित्रासोबत तिचे प्रेम आहे.
आठ ते नऊ महिन्यांपूर्वी ती मित्रासोबत वाळूज परिसरात फिरायला गेली आणि दोघांनीही त्यांच्या सीमा ओलांडल्या. यातून तिला गर्भधारणा झाल्याचे कळाले तेव्हा फार उशीर झाला होता. तो तिला भेटत नव्हता. तिने अनेकदा प्रयत्न केले. मात्र, तो तिला टाळत असल्याचे तिच्या लक्षात आले. १२ आठवड्यांनंतर गर्भपात करता येत नाही. यामुळे पोटातील गर्भ वाढू देण्याशिवाय तिच्यासमोर पर्याय नव्हता. घटनेच्या दोन दिवसांपूर्वी तिने मुलाला जन्म दिला. घाटीतून डिस्चार्ज घेतल्यानंतर ती विद्यापीठ परिसरात गेली आणि गुपचूप बाळ टाकून ती घरी परतली.
अनाथाश्रमात केले दाखल
बाल न्याय समितीच्या आदेशाने पोलिसांनी चिमुकल्याला सिडकोतील भारतीय समाजसेवा संस्थेत दाखल केले.