मराठवाड्यात न भूतो न भविष्यती पाऊस; ७०० हून अधिक नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2021 07:35 PM2021-09-29T19:35:08+5:302021-09-29T19:37:18+5:30
विभागात २८ रोजी दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही. कधी हलका तर कधी जाेरदार पाऊस दिवसभर सुरू होता.
औरंगाबाद: गुलाब वादळाने निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्याने सुरू असलेला पाऊस मराठवाड्यात तांडव करू लागला आहे. मंगळवारी झालेल्या पावसामुळे विभागातील लहान-मोठ्या नद्यांचे पात्र दुथडी भरून वाहू लागले असून, ७०० हून अधिक नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. अनेक गावांचा संपर्क तुटला. लातूर येथील बचाव कार्यासाठी एनडीआरएफची टीम आणि हेलिकॉप्टरची मागणी नोंदविण्यात आली. विभागात २८ रोजी दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही. कधी हलका तर कधी जाेरदार पाऊस दिवसभर सुरू होता.
औरंगाबाद: गोंदेगाव, पोहरी बु. निंभोरा येथील २० घरांची पडझड झाली. सोयगाव तालुक्यातील जरंडी तलाव ओव्हरफ्लो झाला असून, घरांची पडझड झाली आहे. लिहाखेडा येथील डी.पी.वर वीज कोसळून दोन ट्रान्सफार्मर जळाले. सिल्लोड तालुक्यातील धानोरा ते पूर्णवाडी, बेलेश्वर वाडी, काकडेवाडी येथील पूर्णा नदीला पूर आल्याने गावांचा संपर्क तुटला. गिरीजा धरण सांडव्यातून मोठ्या प्रमाणात पाणी ओसंडून वाहत आहे. गंगापूर तालुक्यातील आलापूरवाडी येथील पुलावरून पाणी आल्याने वाहतूक बंद आहे. शिवना टाकळी येथील धरण भरल्याने २० हजार क्युसेसने पाणी सोडण्यात आले, तसेच लासूर स्टेशन येथे नागपूर-मुंबई हायवे पुलावरून नदीचे पाणी ओव्हर फ्लो झाले.
जालना: जाफ्राबाद तालुक्यातील आंबेगाव येथील संजय शिंदे यांच्या मालकीचा बैल वीज पडून मृत्युमुखी पडला. घनसावंगी तालुक्यातील सिध्देश्वर पिंपळगावातील अनेक घरांत पाणी शिरले. जांबसमर्थ येथील पाझर तलाव फुटल्याने शेतात पाणी शिरले.
हिंगोली: मधुमती नदीला पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला.
बीड: अंबाजोगाई येथे १९ व्यक्ती पुरात अडकले. त्यांना बचाव पथकाने बोटीच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. सावळेश्वर येथील पाझर तलावातील पाण्याला मोकळी वाट करून देण्यात आली. तसेच केज तालुक्यातील भाटूंबा गावात पाणी शिरल्याने अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे.
लातूर: देवळा येथील पुरात नागरिक अकडले. त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविले आहे. रेणापूर तालुक्यातील घनसरगाव, डिगोळ देशमुख, सारसा येथील व्यक्ती पुरात अडकल्या. त्यांच्या बचावासाठी एनडीआरएफची टीम तसेच हेलीकॉप्टरची मागणी शासनाकडे नोंदविण्यात आली.
उस्मानाबाद: भंडारवाडी येथील तेरणा नदीपात्रात बालाजी कांबळे यांचा वाहून गेलेला मृतदेह सापडला नाही. तसेच वाशी येथील पद्मीनी राख यांना मृतदेह पाण्यात आढळला. तेरणेच पाणी गावांत घुसल्याने उस्मानाबादमधील इरला येथील १५०, रामवाडी येथील ३२५, दाऊदपूर येथील ६ व्यक्तींना जि.न.शाळेत हलविले. कळंब तालुक्यातील वाकडी येथील ३ घरांना पुराने वेढले. १७ व्यक्ती छतावर अडकून पडले होते. एनडीआरएफने सर्वांना सुखरूप बाहेर काढले. देवधानोरा येथील बंधारा पहाटे तीन वाजेच्या सुमारास फुटला.