रविवारच्या बाजारात सेकंडहँड ४३ टीव्हीला अधिक मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2018 06:35 PM2018-12-23T18:35:08+5:302018-12-23T18:35:51+5:30
जाफरगेट परिसरात दर रविवारी भरणारा आठवडी बाजार आता सेकंडहँड टीव्हीसाठी ओळखला जाऊ लागला आहे. दिवसभरात येथे ४३ टीव्हींची विक्री झाली. एवढेच नव्हे, तर मोबाईल हँडसेटपासून ते खराब लेजर प्रिंटरपर्यंत सर्व काही या बाजारात विक्रीला येते.
औरंगाबाद : जाफरगेट परिसरात दर रविवारी भरणारा आठवडी बाजार आता सेकंडहँड टीव्हीसाठी ओळखला जाऊ लागला आहे. दिवसभरात येथे ४३ टीव्हींची विक्री झाली. एवढेच नव्हे, तर मोबाईल हँडसेटपासून ते खराब लेजर प्रिंटरपर्यंत सर्व काही या बाजारात विक्रीला येते. ‘चले तो चाँद तक नही तो शाम तक’ असेच म्हटले जाते. ‘नो गॅरंटी’ म्हणून टीव्ही विकले जातात. फक्त तुमची नजर पारखी पाहिजे. येथे हमाल, मजुरी करणारेच नव्हे, तर इंजिनिअरिंगचे विद्यार्थीही विविध साहित्य खरेदीसाठी येतात.
आठवडी बाजारात टीव्हींची विक्री होते असे कोणी म्हटले तर त्यावर अनेक जण विश्वास ठेवणार नाही; मात्र रविवारच्या आठवडी बाजारात टीव्ही विक्री होतात. तेही छोट्या छोट्या तंबूमध्ये....पण टीव्ही सेकंडहँड असतात. टीव्ही खरेदीसाठी शहरापेक्षा ग्रामीण भागातून ग्राहक अधिक येत आहेत. आज तर जालना, बीडच नव्हे, तर धुळे जिल्ह्यातूनही ग्राहक खास टीव्ही खरेदीसाठी येथे आले होते. टीव्ही विक्रेते इम्रान म्हणाले की, मुंबईत एक्स्चेंज आॅफरमध्ये मोठ्या प्रमाणात जुने टीव्ही येतात. त्याची विक्री केली जाते. तेच टीव्ही रविवारच्या आठवडी बाजारात आणले जातात. काही टीव्ही खराब असतात त्यांना दुरुस्त करून ते विकले जातात. अवघ्या २ हजारापासून ते १० हजार रुपयांदरम्यान टीव्ही विकले जातात. १६ लहान-मोठ्या तंबूंमध्ये टीव्ही विक्रीसाठी ठेवण्यात येतात. फसू नये यासाठी ग्राहक सोबत इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील जाणकार व्यक्तीला घेऊन येतात. तरीपण अनेक जण फसतातही; मात्र कोणतीही गॅरंटी दिली जात नसल्याने तक्रार करण्यासाठी सहसा कोणी येत नाही.
नसीम म्हणाले की, इंजिनिअरिंगचे विद्यार्थीही आठवडी बाजारात येत असतात. जुन्या इलेक्ट्रॉनिक्स उपकरणातील चांगले पार्ट काढून त्यातून नवीन प्रयोग केला जातो. थ्रीजी सेकंडहँड मोबाईल हँडसेटपासून लेझर प्रिंटरपर्यंत या बाजारात सर्व काही विक्री होते. जुन्या म्युझिक सिस्टीमलाही येथे मागणी असते.
जामखेड परिसरातील नानासाहेब वाघमारे या ग्राहकाने सांगितले की, त्याचा कटलेरीचा व्यवसाय आहे. ३२ इंची नवीन टीव्ही खरेदी करणे परवडत नसल्याने ४ हजार रुपयांत सेकंडहँड एलसीडी खरेदी केला. अनेक ग्राहक प्लास्टिकच्या बारदान्यामधून टीव्ही नेताना दिसून आले.
वापरलेल्या बुटांनाही ग्राहक
कोणी वापरून फेकून दिलेले बूटही आठवडी बाजारात विक्रीला आणले जातात. ते बूटही खरेदी करताना काही ग्राहक दिसून आले, तसेच अवघ्या २० ते २५ रुपयांत मिळणाऱ्या अँडरवेअर व बनियन खरेदी करणाºयांचीही हातगाडीभोवती ग्राहकांची झुंबड उडाली होती.