शिक्षणापेक्षा मुलांच्या आरोग्याची काळजी अधिक; १५ जून रोजी शाळा सुरू करण्यास विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2020 07:35 PM2020-05-28T19:35:47+5:302020-05-28T19:36:32+5:30

परिस्थिती नियंत्रणात आणल्याशिवाय सुरू न करण्याचा आग्रह

More health care for children than education; Opposition to start school on June 15 | शिक्षणापेक्षा मुलांच्या आरोग्याची काळजी अधिक; १५ जून रोजी शाळा सुरू करण्यास विरोध

शिक्षणापेक्षा मुलांच्या आरोग्याची काळजी अधिक; १५ जून रोजी शाळा सुरू करण्यास विरोध

googlenewsNext
ठळक मुद्दे३० जूनपर्यंत शाळा भरवणे योग्य ठरणार नाही

औरंगाबाद : मुलांना शिक्षण मिळालेच पाहिजे. शिक्षणामुळेच त्यांचा विकास होणार आहे. मात्र,  त्याबरोबरच मुलांच्या आरोग्याची अधिक काळजी वाटते. शहरात कोरोनाची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत असतानाच १५ जून रोजी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय तात्काळ मागे घेण्याची गरज असल्याचा सूर शहरातील पालकांसह संस्थाचालक, मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी काढला. 

राज्य शासनाने १५ जूनपासून शाळा सुरू करता येतील का, याविषयी चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे.  यासंदर्भात ‘लोकमत’ने शहरातील  पालक, मुख्याध्यापक आणि संस्थाचालकांची मते जाणून घेतली. शहरातील शाळांची आणि विद्यार्थ्यांची संख्या पाहता कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना शाळांमध्ये नियम पाळले जातील का, असा प्रश्न यावेळी सर्वांनी उपस्थित केला. फिजिकल डिस्टन्सिंगचा नियम पाळण्यासाठी शाळांकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा आहेत का, विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या बस, अ‍ॅटोरिक्षांमध्ये विद्यार्थी दाटीवाटीने बसविले जातात. शाळा सुरू झाल्यास या विद्यार्थ्यांच्या प्रवासाचे काय होणार, असे अनेक प्रश्न पालकांनी उपस्थित केले आहेत. या सर्व अडचणींमुळे अनेदक पालकांनी पाल्यांना शाळेत न पाठविण्याचीच भूमिका घेतली आहे. घरी बसून त्याचा अभ्यास घेता येईल. मात्र, त्यास शाळेत पाठवून जीव धोक्यात घालण्यास आम्ही तयार नाहीत, असेही काही पालकांनी सांगितले. 

शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी करणार
राज्य शासनाने १५ जूनपासून शाळा सुरू करा, असा आदेश दिलेला नाही. सुरू करण्याच्या दृष्टीने चाचपणी सुरू आहे. याविषयी शाळा, पालक यांची मते अजमावून पाहण्यात येत आहेत. तरीही राज्य शासनाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याला औरंगाबाद शिक्षण विभागाचे प्राधान्य असणार आहे. 
-सूरजप्रसाद जयस्वाल, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जि.प. 

३० जूनपर्यंत शाळा भरवणे योग्य ठरणार नाही
शहरातील कोरोनाची परिस्थिती सुधारलेली नाही. शासनाने शाळा सुरू करण्यासाठी नियोजन आतापासून सुरू केले, हे चांगलेच आहे. मात्र, १५ जूनला शाळा सुरू करणे धोक्याचे ठरेल. किमान ३० जूनपर्यंत तरी शाळा सुरू करू नयेत, असे आमचे मत आहे. तरीही शासनाने १५ जून रोजी शाळा  सुरू करण्याचा निर्णय घेतल्यास आम्ही तयारी करूत. 
-प्रल्हाद शिंदे, अध्यक्ष, महाराष्ट्र इंग्रजी संस्थाचालक संघटना

विद्यार्थ्यांना पालक शाळेत पाठवणार नाहीत
राज्य शासनाने १५ जूनपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, पालकांमध्ये कोरोनाविषयी प्रचंड भीती आहे. या भीतीमुळे पालक विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणारच नाहीत. आरटीई प्रवेशाची प्रक्रिया अद्याप केलेली नाही. यातून एक लाख विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो. हे असे असताना शाळा कशा सुरू करणार आहेत, हे अधिकाऱ्यांनाच माहीत. 
-प्रशांत साठे, अध्यक्ष, आरटीई पालक संघ 

चौकशी केल्याशिवाय मुलाला पाठवणार नाही
शाळा सुरू झाल्यानंतर जाण्या-येण्यासाठी असलेल्या गाडीतील सुरक्षा, सॅनिटायझरसह इतर साधने उपलब्ध करण्यात येणार आहेत का? याशिवाय सर्व पालकांची शाळेत बैठक घेऊन सूचना करूत, मुलांच्या सुरक्षिततेची जेव्हा हमी मिळेल तेव्हाच मुलाला शाळेत पाठण्याचा निर्णय घेऊ. 
-ज्योती जाधव, पालक

औरंगाबाद शहरात शक्यच नाही
शाळांतील खोल्या छोट्या आहेत. त्यात फिजिकल डिस्टन्सिंंग पाळणे शक्य होणार नाही. यात पहिली गोष्टी पालकच विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणार नाहीत. नुकसान होऊ नये म्हणून दहावीच्या विद्यार्थ्यांची एखादी तुकडी सुरू करता येऊ शकते. मात्र, सरसकट शाळा सुरू करणे धोक्याचे ठरेल. औरंगाबाद शहरात १५ जून रोजी शाळा सुरू करणे शक्य होणार नाही. 
-संध्या काळकर, मुख्याध्यापिका

Web Title: More health care for children than education; Opposition to start school on June 15

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.