आणखी नवीन अकरा महाविद्यालयांची भर
By Admin | Published: September 15, 2014 12:52 AM2014-09-15T00:52:45+5:302014-09-15T00:58:04+5:30
औरंगाबाद : उच्चशिक्षण विभागाने राज्यात नवीन ४६ महाविद्यालयांना मंजुरी दिली असून, यातील ११ महाविद्यालये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील चार जिल्ह्यांतील आहेत.
औरंगाबाद : उच्चशिक्षण विभागाने राज्यात नवीन ४६ महाविद्यालयांना मंजुरी दिली असून, यातील ११ महाविद्यालये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील चार जिल्ह्यांतील आहेत.
यासंदर्भात मिळालेली माहिती अशी की, नवीन पदवी अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयांना मंजुरी मिळण्यासाठी शिक्षण संस्थांनी उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडे प्रस्ताव सादर केले होते. त्यानुसार उच्च शिक्षण विभागाने राज्यात ४६ महाविद्यालये सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. त्यामध्ये विद्यापीठ कार्यक्षेत्रातील औरंगाबाद जिल्ह्यात ८, उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा व भूम तालुक्यातील ईट येथे २ आणि बीड येथे १, अशा ११ नवीन महाविद्यालयांना परवानगी मिळाली आहे. विशेष म्हणजे परवानगी मिळालेली बहुसंख्य महाविद्यालये ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची आहेत.
शैक्षणिक वर्ष सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी लोटला आहे. तेव्हा ही महाविद्यालये पुढील शैक्षणिक वर्षापासूनच सुरू केली जातील. त्याशिवाय या नवीन महाविद्यालयांना पुढील शैक्षणिक वर्षापासून विद्यापीठाचे संलग्नीकरणही मिळेल. तत्पूर्वी, या संस्थांना महाविद्यालयासाठी इमारत, पुरेशा वर्ग खोल्या, विद्युत व्यवस्था, प्रयोगशाळा, ग्रंथालय, स्वच्छतागृह, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आदी पायाभूत सुविधा उभाराव्या लागणार आहेत.
आता ४०७ महाविद्यालये
४डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांची संख्या ३९६ एवढी होती.
४आता नवीन ११ महाविद्यालयांची भर पडल्यामुळे पुढील वर्षी या महाविद्यालयांनी संलग्नीकरणाची सर्व पूर्तता केल्यास संलग्नित महाविद्यालयांची संख्या ४०७ एवढी होईल.