रस्त्याच्या मानाने एसटीचा अधिक वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:02 AM2020-12-24T04:02:16+5:302020-12-24T04:02:16+5:30
औरंगाबाद : सिडको बसस्थानकातून निघालेल्या बसचा वेग रस्त्याच्या दृष्टीने जास्त होता. चालकाचेही बसवर नियंत्रणही नव्हते. त्यातूनच हा अपघात घडल्याचा ...
औरंगाबाद : सिडको बसस्थानकातून निघालेल्या बसचा वेग रस्त्याच्या दृष्टीने जास्त होता. चालकाचेही बसवर नियंत्रणही नव्हते. त्यातूनच हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी वर्तविला आहे. आरटीओ कार्यालयाकडून या बसची तपासणी केली जाणार आहे. अपघाताच्या वेळी ब्रेक फेल झाले होते का, हे आरटीओ कार्यालयाच्या तपासणीनंतर स्पष्ट हाेईल. ही तपासणी आगामी २ दिवसांत होईल, असे विभाग नियंत्रक अरुण सिया यांनी सांगितले.
किमान ३० कि.मी. चा वेग असावा
दुचाकी ज्या अवस्थेत बसच्या आतपर्यंत गेली, ही परिस्थिती पाहता बसचा किमान वेग हा ३० कि. मी. असावा. सिडको बसस्थानकातून निघाल्यानंतर काही अंतरावरच हा अपघात झाला. ही स्थिती लक्षात घेता या रस्त्यावर किमान वेग १० कि.मी.पेक्षा कमी असला पाहिजे, असे एसटी महामंडळाच्या सूत्रांनी सांगितले.
जखमी प्रवाशांना आर्थिक मदत
अपघातात जखमी झालेल्या १० प्रवाशांना प्रत्येकी ५०० रुपये ते एक हजार रुपयांची मदत करण्यात आली; परंतु घाटीत दाखल झालेल्या प्रवाशांना कोणतीही मदत मिळाली नाही.
३ वर्षांपूर्वीच्या अपघाताची आठवण
३ वर्षांपूर्वी सिडको बसस्थानकातून भुसावळसाठी निघालेल्या एसटीचा याच रस्त्यावर अपघात झाला होता. सिग्नलवरून बस जाताना रिक्षा अगदी समोर आल्याने भीषण अपघात झाला. या अपघात दोघांचा जीव गेला तर सात जण जखमी झाले होते.