विद्यापीठात मराठी, संस्कृतपेक्षा उर्दू शिकण्याकडे अधिक कल; सर्वच भाषा विषयात प्रवेश रिक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2022 12:15 PM2022-09-26T12:15:26+5:302022-09-26T12:15:26+5:30
भाषा विषयात दिसतेय विद्यार्थ्यांची धरसोड वृत्ती,या शैक्षणिक वर्षात कोणत्याच भाषा विषयासाठी १०० टक्के प्रवेश झाले नाहीत
- योगेश पायघन
औरंगाबाद : भाषा विषयांकडे विद्यार्थ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे पदव्युत्तर शिक्षणात गेल्या काही वर्षांत मरगळ आली. ती यावर्षी काही अंशी झटकली गेली आहे. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, संस्कृत, पाली व बुद्धिझम या पदव्युत्तर शिक्षणासाठी विद्यार्थ्यांची संख्या वाढली असली तरी एकाही विषयात क्षमतेएवढे प्रवेश झालेले नाही. भाषा विषयातील संधी, पारंपरिक ऐवजी व्यावसायिक पद्धतीने संधी देण्याच्या अभ्यासक्रमांची रचना, गरज असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.
पारंपरिक अभ्यासक्रमांची व्यावसायिक दृष्टिकोनातून निर्मिती झाली पाहिजे. विद्यापीठातून शिक्षण घेऊन बाहेर पडल्यावर त्याला रोजगार, स्वयंरोजगार मिळू शकला तर विद्यार्थ्यांचा ओढा वाढेल. सध्याचा काळ वाईट असला तरी भाषांना पुढील काळात संधीचा असेल. पुढच्या संधी आणि उपलब्ध संधीच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना तयार करण्याची गरज असल्याचे मराठी विभागाचे सहयोगी प्राध्यापक डाॅ. कैलास अंभुरे म्हणाले.
मराठी, संस्कृतपेक्षा उर्दूला अधिक प्रतिसाद
शैक्षणिक वर्ष २०१७-१८ मध्ये निम्म्यापेक्षाही कमी प्रवेश एम. ए. मराठी, संस्कृत, उर्दूमध्ये होते. त्यानंतर पुढील दोन वर्षांत प्रवेशाची टक्केवारी वाढली. मात्र, कोरोनाकाळात दोन वर्षे पुन्हा टक्का घसरला होता. यावर्षी या तीन विषयांपैकी सर्वाधिक प्रवेश उर्दूमध्ये आहेत, तर मराठी, संस्कृतमध्ये ३० अनुक्रमे सात आणि नऊ जागा रिक्त आहेत.
कोरोनाकाळात प्रवेशाचा टक्का घसरला
२०२०-२१ मध्ये इंग्रजी विषयातील प्रवेशात वाढ वगळता इतर सर्व भाषा विषयांत घसरण झाली. ही घसरण निम्म्यावर झाल्याने या विभागांना सहा २०१७-१८ चा काळ आठवला होता. सर्वाधिक कमी केवळ ९ प्रवेश संस्कृत विभागात होते. मात्र, कोरोना ओसरल्यावर सर्व भाषांत प्रवेशाची यावर्षी वाढ झाली; परंतु इंग्रजीच्या प्रवेशात घसरण आकडेवारीवरून दिसून येते.
मराठीला केंद्रस्थानी आणले पाहिजे...
विद्यार्थी घडवण्यासाठी नव्या अभ्यासक्रमात संधीनुसार कौशल्य आधारित शिक्षणावर भर देण्यात आला आहे. पदवीत द्वितीय मायबोली, द्वितीय भाषा ऐवजी भारतीय भाषा अशा छोट्या बदलांतूनही बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. इंग्रजीच्या आहारी गेल्याने सर्वच ठिकाणी प्रादेशिक भाषांतील संधींची अडचण झाली आहे. शालेय व पदवी शिक्षणात मराठी भाषेला केंद्रस्थानी आणल्यास मराठीची गोडी वाढेलच, शिवाय त्यामुळे संधीही निर्माण होतील.
-डाॅ. दासू वैद्य, विभागप्रमुख, मराठी विभाग
संधीसाठी विद्यार्थ्यांना तयार करतोय...
उतार चढाव प्रत्येक विषयांसोबत असतात. मात्र, भाषा विषय कधीच संकटात येणार नाहीत. त्यातही हिंदीत अनेक संधी उपलब्ध आहेत. त्या विद्यार्थ्यांना समजावून सांगाव्या लागतील. केवळ साहित्य म्हणजेच भाषा नाही. तो एक भाग असला तरी पत्रकारिता, सिनेमा, अनुवाद, शासकीय कार्यालयातील संधींसाठी विद्यार्थ्यांना तयार करत असल्याने विद्यार्थी संख्या वाढते आहे.
-डाॅ. भारती गोरे, विभागप्रमुख, हिंदी विभाग.
इंग्रजीत संधीचा विचार करून प्रवेश...
प्रवेश घेताना विद्यार्थी पुढील संधीचा विचार करतात. इंग्रजी माध्यमांच्या शाळा, शिकवणीसह खासगी क्षेत्रात इंग्रजीच्या विद्यार्थ्यांना संधी आहेत. त्या तुलनेत शासकीय नोकऱ्यांत, संशोधनातील गेल्या काही वर्षांतील संधी घटल्या. मात्र, इतर शाखांत शिक्षण पूर्ण करून इंग्रजी शिकणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे.
-डाॅ. गीता पाटील, विभागप्रमुख, इंग्रजी विभाग.
उर्दू शिकण्याकडेही ओढा....
उर्दूत संशोधनाच्या आणि नोकरीच्या संधीमुळे प्रवेशाची स्थिती गेल्या काही वर्षांत वाढती दिसून येत आहे. त्यामुळे यावर्षीही ४० पैकी ३९ प्रवेश निश्चित झाले. महाविद्यालयांतही उर्दू पदव्युत्तर शिकणाऱ्यांची संख्या वाढताना दिसत आहे.
-डाॅ. कीर्ती मालिनी, विभागप्रमुख, उर्दू विभाग.
अशी आहे विद्यापीठातील प्रवेशाची स्थिती
वर्ष -मराठी -हिंदी -इंग्रजी -संस्कृत -पाली -उर्दू
२०१७- १८ - १८ - २४ - ६६ -१४ - २२ - १३
२०१८-१९ -२८ -३१ -६९ -८ -२१ -११
२०१९-२० -४४ -३० -६० -१५ -४३ -२०
२०२०-२१ -२२ -२० -६१ -२२ -१६ -१३
२०२१-२२ -२० -३६ -५२ -९ -२६ -३३
२०२२-२३ -३३ -३८ -४६ -३१ -३७ -३९