मराठवाड्यात पाऊस सरासरीपेक्षा जास्त होण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2022 12:08 PM2022-09-05T12:08:01+5:302022-09-05T12:10:11+5:30
यंदाच्या पावसाळ्यात आजवर ५२ जणांचा बळी गेला आहे, तर ९६० लहान-मोठ्या जनावरांचाही मृत्यू झाला आहे.
औरंगाबाद : मराठवाड्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत आजवर ९० टक्के पाऊस झाला असून, आगामी काळात विभागात पाऊस यंदा सरासरीपेक्षा होण्याची शक्यता आहे. आजवरच्या पावसामुळे विभागातील ११ मोठ्या प्रकल्पांत ९१ टक्के जलसाठा आला आहे. सप्टेंबर अखेरपर्यंत नियमित पावसाळा गृहीत धरण्यात येतो. जून, जुलै व ऑगस्ट या तीन महिन्यांत सरासरीच्या ११३ टक्के पाऊस झाला आहे. ५१३ मि.मी. पाऊस या तीन महिन्यांत होणे अपेक्षित होते. या तुलनेत ५८० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
सप्टेंबर महिन्यांतील चार दिवसांत ३१ मि.मी. पाऊस झाला आहे. विभागाची वार्षिक सरासरी ६७९ मि.मी. असून, या तुलनेत ६११ मि.मी पाऊस झाला आहे. सरासरीच्या तुलनेत हे ९० टक्के प्रमाण आहे. गणेशोत्सवापासून रोज सायंकाळी पाऊस दमदार हजेरी लावतो आहे. मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात पाऊस बरसतो आहे.
तीन महिन्यांत २१८ मंडळात अतिवृष्टी---
जून, जुलै व ऑगस्ट या तीन महिन्यांत ४५० पैकी २१८ मंडळांत अतिवृष्टी झाली. यात ११३ मंडळात एक वेळा, दोन वेळा ४८ मंडळांत, तीन वेळा ३७, चार वेळा १५ मंडळांत, तर पाच वेळा ३ मंडळांत अतिवृष्टी झाली. २ मंडळांत सहा वेळा अतिवृष्टी झाली. सर्व युनिटचा विचार करता ४०७ मंडळे अतिवृष्टीच्या रेट्यात आली.
काही प्रकल्प तुडुंब---
विभागात मोठे, मध्यम व लघू प्रकल्पांची संख्या ८७३ आहे. यातील ११ मोठ्या प्रकल्पांत ९१ टक्के जलसाठा सध्या आहे. ७५ मध्यम प्रकल्पांत ७० टक्के, ६४६ लघू प्रकल्पांत ६१ टक्के जलसाठा सध्या आहे. यातील काही प्रकल्प तुडुंब होण्याच्या वाटेवर आहेत.
तीन महिन्यांत ५२ जणांचा बळी---
यंदाच्या पावसाळ्यात आजवर ५२ जणांचा बळी गेला आहे, तर ९६० लहान-मोठ्या जनावरांचाही मृत्यू झाला आहे. ८ हजार २४६ मालमत्तांची पडझड या पावसाळ्यात झाली आहे.