सकाळी अंत्यसंस्कार, सायंकाळी लग्न समारंभ
By Admin | Published: April 24, 2016 11:49 PM2016-04-24T23:49:28+5:302016-04-25T00:41:42+5:30
संजय तिपाले , बीड नियतीच्या अनाकलनीय खेळाचा प्रत्यय रविवारी शिरूर तालुक्यातील पाडळी येथील इंगळे कुटुंबियांना आला. घरात लग्नकार्य, नातेवाईकांनी भरलेले घर
संजय तिपाले , बीड
नियतीच्या अनाकलनीय खेळाचा प्रत्यय रविवारी शिरूर तालुक्यातील पाडळी येथील इंगळे कुटुंबियांना आला. घरात लग्नकार्य, नातेवाईकांनी भरलेले घर, अशा आनंदी वातावरणात नवरीच्या भावाचा अपघाती मृत्यू झाला अन् घर शोकसागरात बुडून गेले. त्याच्यावर सकाळी अंत्यसंस्कार करून सायंकाळी जड अंत:करणाने साध्या पद्धतीत चुलत बहिणीचा विवाह पार पडला.
पाडळी येथील आदेश नारायण इंगळे (१८) हा त्याचा गावातील मित्र रामेश्वर घोडकेसोबत शनिवारी सायंकाळी सात वाजता तिंतरवणीला लग्नपत्रिका देण्यासाठी दुचाकीवरून (क्र. एमएच-२३ व्ही-८२३९) जात होता. लिंबगाव मायंबाजवळ अज्ञात वाहनाने धडक दिल्याचे त्याचा जागीच मृत्यू झाला, तर रामेश्वर जखमी आहे. वार्ता इंगळे कुटुंबियांना समजताच आनंदावर विरजण पडले. मयत आदेशची चुलत बहीण वर्षा पांडुरंग इंगळे हिचा रविवारी सायंकाळी विवाह होता. या तयारीत इंगळे कुटुंब व्यस्त होते. घरात आक्रोश सुरू झाला. मध्यरात्री शवविच्छेदन करून सकाळी त्याचा मृतदेह गावात आणला गेला. तेथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, लग्नासाठी केलेली सारी तयारी पाहून नवरदेवाकडील मंडळींनी अशाही परिस्थितीत लग्नास होकार दर्शविला. त्यानुसार रविवारी सायंकाळी ठरलेल्या मुहूर्तावर वर्षाचा विवाह लावून देण्यात आला. यावेळी साधेपणा होता. ना फटाक्यांची आतषबाजी होती, ना वाजंत्रीचा दणदणाट. अतिशय गंभीर व दु:खी वातावरणात हा विवाहसोहळा पार पडला.
केज/ पाटोदा/ चकलांबा : जिल्ह्यात रविवारी आणखी दोन अपघात झाले, त्यात दोन मुलींचा मृत्यू झाला. केज, पाटोदा व शिरुर तालुक्यात या घटना घडल्या. केज तालुक्यातील सारुळ पाटीवर कारच्या धडकेने दीपाली भिवाजी बांगर (१२, रा. जोला ता. केज) या मुलीचा जागीच मृत्यू झाला. औरंगाबादहून होळकडे विवाह समारंभासाठी निघालेल्या धर्मराज शिंदे यांच्या कारच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. दीपाली ही आजीसोबत नेकनूर येथील बाजाराला जाण्यास निघाली होती. वाहनाच्या प्रतीक्षेत ती उभी होती.
४केज येथील उपजिल्हा रूग्णालयात उत्तरीय तपाणी झाली. त्यानंतर अंत्यसंस्कार झाले. याप्रकरणी गया भिवाजी बांगर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला. अपघातानंतर चालक फरार झाला. कार जप्त केली असून फौजदार आनंद वाठोरे तपास करीत आहेत.
४दुसऱ्या अपघातात पाटोदा तालुक्यातील भुरेवाडी येथे ट्रॅक्टरने सात वर्षीय बालिकेस चिरडले. यात ती जागीच गतप्राण झाली. वनिता शिवाजी सानप (रा. सावरगाव, ता. पाटोदा) असे मयत मुलीचे नाव आहे. आईच्या बाळंतणात ती आजोळी आली होती. सकाळी शौचासाठी शेतात गेली होती. परतताना ट्रॅक्टर क्र. (एम.एच. २३ -सी- ५९५६) ने तिला उडवले. मागील चाकाखाली सापडून तिचा मृत्यू झाला. तानाजी सानप यांच्या फिर्यादीवरुन ट्रॅक्टरचालक अमर लक्ष्मण शिंदे (रा. सौताडा ता. पाटोदा) याच्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला. जमादार जालींदर शेळके तपास करत आहेत.