ठेकेदाराने अर्धवट सोडलेल्या रस्त्यावर अडीच वर्षांपासून मरणयातना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:02 AM2021-09-05T04:02:07+5:302021-09-05T04:02:07+5:30
गंगापूर : गंगापूर ते सिद्धपूर या अडीच किलोमीटर रस्त्याची दुरवस्था झाली असून, येथून जाताना नागरिकांना मरणयातना भोगाव्या लागत असल्याचे ...
गंगापूर : गंगापूर ते सिद्धपूर या अडीच किलोमीटर रस्त्याची दुरवस्था झाली असून, येथून जाताना नागरिकांना मरणयातना भोगाव्या लागत असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. पावसामुळे रस्ते निसरडे झाले आहेत. रस्त्याच्या कामाचा कार्यारंभ आदेश निघालेला असून, अडीच वर्षांपूर्वी कामाला सुरुवात होऊनदेखील ठेकेदाराने अर्धवट काम सोडल्याने त्याचा त्रास नागरिकांच्या माथ्यावर येऊन पडला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस प्रशासनाच्या विरोधात गावकऱ्यांचा रोष वाढू लागला आहे.
गंगापूरपासून अवघ्या दोन ते अडीच किमी अंतरावर असलेल्या सिद्धपूर गावाच्या रस्त्याचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यासाठी गावकऱ्यांनी आंदोलने केली. नागरिकांचा दळणवळणासाठी नेहमी शहरात राबता आहे. शिवाय विद्यार्थीदेखील याच रस्त्याने ये-जा करतात. परंतु हाकेच्या अंतरावर असलेल्या सिद्धपूर गावाच्या रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून मागणी केलेल्या या अडीच किमी रस्त्याच्या कामाला २०१९ मध्ये मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून ८८ लाख २४ हजार रुपये व पुढील पाच वर्षांसाठी रस्त्यांचा देखभाल दुरुस्तीकरिता सहा लाख २९ हजार रुपये मंजूर आहे. शिवाय कार्यारंभ आदेश पारित असून, ७ मार्च २०१९ रोजी रस्त्याच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवातदेखील झाली होती. पुढील नऊ महिन्यांचा कालावधी काम पूर्ण होणे अपेक्षित असताना ठेकेदाराने काही दिवसांतच काम बंद केले. त्यामुळेे रस्त्याची अवस्था जैसे थेच राहिली आहे. नागरिकांना पावसाळ्यात या रस्त्यावर चालणे मुश्कील झाले आहे. लवकरात लवकर प्रलंबित रस्त्याचे काम सुरू न झाल्यास आंदोलनाचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.
--------
ठेकेदाराच्या गलथानपणामुळे व सा.बां. विभागाने दुर्लक्ष केल्याने गावासाठी असलेल्या एकमेव रस्त्याची दुर्दशा झाली आहे. काम त्वरित सुरू न झाल्यास गावकऱ्यांना सोबत घेऊन आंदोलन करणार आहोत. - हिराबाई यादव, सरपंच, सिद्धपूर
स्वातंत्र्यानंतर या रस्त्याचे काम एकदादेखील झालेले नाही. मंजूर रस्ता अर्धवट सोडल्याने गावकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्याच्या मागणीसाठी गावकरी एकजूट होऊन ग्रामपंचायतीने पुकारलेल्या आंदोलनाला पाठिंबा देणार आहे. - प्रा. गिरजीनाथ जाधव, नागरिक
040921\fb_img_1628910762751.jpg
गंगापूर : सिद्धपुर रस्त्यावर पावसाळ्यात चालणे देखील मुश्किल होते