मोसंबीची झाडे अचानक पिवळी पडली; अज्ञात रोगाने फळबाग शेतकरी हवालदिल
By साहेबराव हिवराळे | Published: December 22, 2023 03:28 PM2023-12-22T15:28:58+5:302023-12-22T15:29:22+5:30
आधीच दुष्काळ, त्यात रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.
लाडसावंगी ( छत्रपती संभाजीनगर): मोसंबी पिकावर अज्ञात रोग पडल्याने झाडे पिवळी पडून वाळत असल्याने फळबाग शेतकरी हवालदिल झाला आहे. आधीच दुष्काळ, त्यात रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.
छत्रपती संभाजीनगर तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला. मात्र उपाययोजना, शेतकऱ्यांना मदतीसाठी अद्याप प्रशासन सरसावले नाही. लाडसावंगी परिसर मोसंबी फळबागांचे माहेरघर असल्याने परिसरात मोसंबी फळबाग शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. गेल्या महिनाभरापासून मोसंबीची झाडे पिवळी पडून झाड कालांतराने पानगळ होऊन झाडे वाळून गेली आहेत. एकीकडे मोसंबी बागेला पाच वर्षांनंतर फळे धरतात, पाच वर्षे जीव लावून झाडे जगवली. ऐन फळबाग शेतकऱ्यांना उत्पन्न देण्याच्या तयारीत असताना झाडावर अज्ञात रोग पडत आहे.
आणखी सहा महिने फळबागा जगवण्याची कसरत शेतकऱ्यांना करावी लागणार आहे. जानेवारीनंतर फळबाग शेतकऱ्यांना टँकरद्वारे पाणी टाकून झाडे जगवण्याची कसरत करावी लागणार आहे. एवढे करूनही फळबाग वाचेल याची शाश्वती नाही. त्यात फळबागांवर अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव वाढत जात आहे.
पंधरा दिवसांपासून झाडे पिवळी
पाचशे मोसंबीची बाग असून गेल्या पंधरा दिवसांपासून झाडे पिवळी पडून पानगळ होत आहे. मी दहा दिवसांत दोन वेळा कीटकनाशक फवारणी केली व ठिबकमधून रासायनिक खताचा डोस दिला; मात्र यापूर्वी मोसंबीवर असा रोग पाहायला मिळाला नाही.
- बाबासाहेब पडूळ शेतकरी
कीटकनाशकाचा डोस द्या..
आधी पाण्याची कमतरता, नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात जोरदार पाऊस, ढगाळ वातावरणामुळे मोसंबी पिकावर मावा व जमिनीत बुरशी तयार झाल्याने मोसंबीची झाडे पिवळी पडत आहेत. जमिनीत हुमनी तयार झाली असल्याने कीटकनाशक फवारणी, जमिनीतून कीटकनाशकाचा डोस दिल्यास रोग पंधरा दिवसांत कमी होऊन झाडे हिरवेगार होतील.
-सुधाकर पाटील, कृषी सहायक, लाडसावंगी