परभणीत सर्वाधिक महाग,उस्मानाबादेत स्वस्त; मराठवाड्यात का आहे इंधन दरात इतकी तफावत?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2022 12:06 PM2022-05-27T12:06:27+5:302022-05-27T12:15:43+5:30
पेट्रोल आणि डिझेलच्या सर्वाधिक दरांमुळे परभणी जिल्ह्याची वेगळी ओळख राज्यात झाली आहे.
औरंगाबाद : केंद्र सरकारने २१ मे रोजी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात अनुक्रमे ८ आणि ६ रुपये प्रतिलीटर कपात केली. त्यामुळे सरासरी पेट्रोल ९.१६ रुपयांनी, तर डिझेल ७.४८ रुपयांनी स्वस्त झाले आहे. मराठवाड्यात प्रतिलीटर पेट्रोल आणि डिझेलचे सर्वाधिक दर परभणी जिल्ह्यात, तर सर्वात कमी दर उस्मानाबाद जिल्ह्यात आहेत. वाहतूक खर्चाच्या प्रमाणात पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी जास्त झाल्या आहेत.
मागील तीन दिवसांपासून भाव स्थिर आहेत. इंधनाच्या वाढत्या दरामुळे महागाई वाढत होती. आंदोलनामुळे सरकारवर दबाव वाढत होता. अखेर २१ मे रोजी पेट्रोल व डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी करण्यात आल्याची घोषणा केंद्र सरकारने केली. रविवारी पहाटे औरंगाबाद शहरात पेट्रोलचे भाव ९.१६ रुपयांनी कमी होऊन ११३ रुपये, तर डिझेल ७.४८ रुपये कमी होऊन ९८.९२ रुपये प्रतिलीटर विकण्यात येऊ लागले.
परभणीत का आहे सर्वाधिक महाग इंधन
पेट्रोल आणि डिझेलच्या सर्वाधिक दरांमुळे परभणी जिल्ह्याची वेगळी ओळख राज्यात झाली आहे. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत परभणी जिल्ह्याला इंधन पुरवठा करण्यासाठी वाहतूक खर्च वाढतो. परिणामी जिल्ह्यात पेट्रोल, डिझेलचे दर इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अधिक आहेत. परभणी जिल्ह्याला सोलापूर येथील तेल डेपोतून पेट्रोल-डिझेलचा पुरवठा होतो. सोलापूरचे अंतर साधारणतः ३१५ किमी आहे. वाहतूक खर्च वाढल्याने त्या प्रमाणात पेट्रोल- डिझेलच्या किमती वाढतात.
जिल्हा २० मे पेट्रोल २६ मे पेट्रोल २० मे डिझेल २६ मे डिझेल
औरंगाबाद १२२.१६ ११३ ९८.९२ १०६. ४०
जालना १२१.८६ ११२.७३ १०४.७० ९६.८३
बीड १२१.५० ११२.४१ १०४.१६ ९६.८६
नांदेड १२२.६७ ११३.५८ १०५.२९ ९७.९९
परभणी १२३.२० ११४.७५ १०८ ९८.७०
हिंगोली १२१.४३ ११२.३५ १०४.११ ९६.८०
लातूर १२१.४८ ११२.३९ १०४.१५ ९६.८३
उस्मानाबाद १२१.४२ १११.८४ १०४.०९ ९६.३१