राज्यात सर्वात महाग रिक्षाचे भाडे औरंगाबादेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 01:15 AM2017-10-23T01:15:31+5:302017-10-23T01:15:31+5:30

सर्वात महाग रिक्षा औरंगाबादेत असल्याची प्रचीती आता बाहेरगावहून येणा-या प्रवाशांना येऊ लागली आहे.

The most expensive rikshaw fare in Aurangabad | राज्यात सर्वात महाग रिक्षाचे भाडे औरंगाबादेत

राज्यात सर्वात महाग रिक्षाचे भाडे औरंगाबादेत

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : राज्यातील अनेक मोठ्या आणि लहान शहरांमध्ये रिक्षाची सेवा आहे. सर्वात महाग रिक्षा औरंगाबादेत असल्याची प्रचीती आता बाहेरगावहून येणा-या प्रवाशांना येऊ लागली आहे. शहरातील ९० टक्के रिक्षाचालक मीटरने भाडे आकारतच नाहीत. प्रत्येक प्रवाशाकडून ठरवूनच भाडे वसूल करतात. रिक्षाचालकांकडून अवाच्या सव्वा भाडे वसूल करण्यात येत असतानाही आरटीओ कोणतीच कारवाई करायला तयार नाही.
ऐतिहासिक औरंगाबाद शहर कधीकाळी टांग्यांचे शहर म्हणून ओळखले जायचे. आता ही ओळख पुसली जाऊन आता हे रिक्षांचे शहर बनले आहे. त्यातही बेकायदा रिक्षांचे, मीटर नसलेल्या रिक्षांचे, बेशिस्त रिक्षाचालकांचे शहर म्हणून या औद्योगिकनगरीला दूषणे दिली जात आहेत.
शहराच्या मुख्य अथवा सिडको बसस्थानकावर पाहुणा उतरला की, रिक्षाचालकाच्या रूपाने त्याला ऐतिहासिकनगरीच्या संस्कृतीची ओळख होते. किंबहुना गाडी बसस्थानकात शिरतानाच प्रवेशद्वारात अस्ताव्यस्त उभ्या असलेल्या रिक्षा पाहून हे शहर किती सुसंस्कृत आहे याचा अंदाज पाहुण्यांना येतो.
शहरात आजमितीला २२ हजार रिक्षा आहेत; पण त्यातील निम्म्या बेकायदा आहेत! शहरात व्यवसाय करण्याचा अधिकृत परवानाच त्यांच्याकडे नाही. आरटीओ, वाहतूक नियंत्रक पोलीस, महापालिका या सगळ्यांचे नियम धाब्यावर बसवत या रिक्षा शहरात फिरून व्यवसाय करीत आहेत. त्यांच्यावर कारवाई झाली तरी ती जुजबी असते. काही होत नाही म्हणून रिक्षाचालकांची दादागिरी हळूहळू वाढू लागली आहे.
नियमातून पळवाटा काढत, संबंधितांना त्यांचा ‘वाटा’ देत आपली वाट मोकळी करीत आहेत. रस्त्यात पडलेले खड्डे, अरुंद झालेल्या गल्लीबोळा, बंद पडलेले सिग्नल, अकार्यक्षम ट्रॅफिक पोलीस यामुळे सर्वसामान्य औरंगाबादकर अलीकडे बरेच वैतागले आहेत. एसटी महामंडळाची शहर बससेवा अत्यंत तोकडी असल्याने औरंगाबादकरांना रिक्षाशिवाय पर्याय नाही; पण याचा गैरफायदा रिक्षाचालक घेत असल्याने नागरिकांपुढील समस्या आणखी वाढल्या आहेत.

Web Title: The most expensive rikshaw fare in Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.