जिल्ह्यात बहुतांश मध्यम, लघुप्रकल्पांना गळती; सर्वेक्षण करण्याचे प्रशासनाचे ऐनवेळी दिले आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 07:30 PM2021-05-15T19:30:59+5:302021-05-15T19:32:53+5:30
जिल्ह्यात जायकवाडी हा मोठा प्रकल्प आहे. तसेच १६ मध्यम, तर ९६ लहान असे एकूण ११३ पाटबंधारे प्रकल्पांशिवाय बरेच पाझर तलाव, जुने तलावही आहेत.
औरंगाबाद : जिल्ह्यातील सुखना, ढेकू, खेळणा, केसापुरी, लहुकी, अंजना, पळशी यासारख्या अनेक मध्यम-लघुप्रकल्पांना लहान-मोठी गळती लागलेली आहे. पावसाळा तोंडावर आला असून, ऐनवेळी जिल्हा प्रशासनाने प्रकल्प गळतीचे सर्वेक्षण करण्याचे आदेश शुक्रवारी दिले आहेत. दोन वर्षांपासून सदरील प्रकल्पांच्या डागडुजीकडे दुर्लक्ष होत आहे. १५ ते २० कोटी रुपयांची दुरुस्तीची मागणी शासन दरबारी पडून आहे.
जिल्ह्यात जायकवाडी हा मोठा प्रकल्प आहे. तसेच १६ मध्यम, तर ९६ लहान असे एकूण ११३ पाटबंधारे प्रकल्पांशिवाय बरेच पाझर तलाव, जुने तलावही आहेत. या तलावांच्या सर्वेक्षणासह त्यांची गळतीबाबत तपासणी करून तत्काळ अहवाल सादर करावा. या तलावांची दुरुस्ती व पूर परिस्थितीचे नियोजन करावे. त्याचबरोबर संभाव्य धोक्यांच्या ठिकाणी नागरिकांना माहिती व सावध करण्याच्या दृष्टीने परिपूर्ण सूचनांचे फलक लावावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करून मान्सूनसाठी सर्व यंत्रणांनी निर्धारित वेळेत कामे पूर्ण करण्याच्या दृष्टीने सज्ज राहण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व यंत्रणाप्रमुखांना दिले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली सभागृहात पार पडली. यावेळी जि.प.चे सीईओ डॉ. मंगेश गोंदावले, अपर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल नेहूल, शहर अभियंता सखाराम पानझडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आदी उपस्थित होते.
धोकादायक पूल, इमारतींची पाहणी करा
पूर बचाव साहित्य अद्ययावत ठेवा, स्थानिक पोलीस व यंत्रणांना माहिती असणे आवश्यक आहे. पूर परिस्थितीने गावांचा संपर्क तुटल्यास वीजपुरवठा, साथरोग नियंत्रणासाठी औषधसाठा, अन्नधान्याचा अतिरिक्त पुरवठा, जनावरांसाठी औषधसाठा, उपलब्ध ८ बोटी व त्यांचे प्रशिक्षित चालक या सर्व बाबींचे योग्य व्यवस्थापन करीत सतर्क राहण्याचीही सूचना यावेळी दिल्या. पावसाळ्यातील पूर परिस्थितीमुळे धोका असलेले पूल, जुन्या इमारती यांची पाहणी करून संबंधितांनी अहवाल सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.