विदेशी विद्यार्थ्यांची विद्यापीठाला सर्वाधिक पसंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:05 AM2021-06-27T04:05:02+5:302021-06-27T04:05:02+5:30
औरंगाबाद : भारतातील अन्य शहरांपेक्षा औरंगाबादेत कमी प्रदूषण, राहण्यासाठी व अभ्यासासाठी पोषक, शांत व सुरक्षित वातावरण आणि शिक्षणाचा उत्तम ...
औरंगाबाद : भारतातील अन्य शहरांपेक्षा औरंगाबादेत कमी प्रदूषण, राहण्यासाठी व अभ्यासासाठी पोषक, शांत व सुरक्षित वातावरण आणि शिक्षणाचा उत्तम दर्जा, आदी बाबींमुळे विविध देशांतील विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शिक्षणासाठी पसंती दिली आहे. नवीन शैक्षणिक वर्षामध्ये तब्बल १२३ विदेशी विद्यार्थ्यांचे प्रवेश या विद्यापीठात झाले असून, अभ्यासक्रमाअभावी बहुतांशी प्रवेशोत्सुक विदेशी विद्यार्थ्यांचे प्रवेश विद्यापीठाने रद्द केले आहेत, हे विशेष!
एकिकडे उच्चशिक्षण घेण्यासाठी मराठवाड्यातील विद्यार्थ्यांचा कल मुंबई किंवा पुण्याकडे वाढला आहे. त्यामुळे मराठवाड्यातील अनेक व्यावसायिक तसेच पारंपरिक महाविद्यालयांना विद्यार्थ्यांच्या टंचाईचा सामना करावा लागत आहे, तर दुसरीकडे विदेशी विद्यार्थ्यांच्या पसंतीला औरंगाबादेतील विद्यापीठ, महाविद्यालये उतरली आहेत. देशातील अन्य शहरांच्या तुलनेत येथे राहण्यासाठी तसेच अभ्यासासाठी शांत व सुरक्षित वातावरण आहे. विद्यापीठ, महाविद्यालयांमधील शिक्षणाचा दर्जा व गुणवत्ता उत्तम आहे. त्यामुळे जास्तीत जास्त विदेशी विद्यार्थी औरंगाबादेतील विद्यापीठ व महाविद्यालयांना पसंती देत असल्याचे नुकतेच स्पष्ट झाले आहे.
भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेची शिष्यवृत्ती मिळालेल्या विदेशी विद्यार्थ्यांनी शिक्षणासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला पसंती दिली. त्यानुसार प्रवेशासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर विद्यापीठातील ‘फाॅरेन असिस्टन्स सेल’ने जे अभ्यासक्रम विद्यापीठ किंवा शहरातील संलग्नित महाविद्यालयांमध्ये उपलब्ध आहेत अशा १२३ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित केले. जे अभ्यासक्रम येथे शिकविले जात नाहीत, अशा जवळपास २५-३० विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करण्यात आले आहेत. हे विद्यार्थी पीएच.डी., पदव्युत्तर तसेच पदवी अभ्यासक्रम शिकण्यासाठी येथे येणार आहेत.
चौकट......
विद्यापीठात स्वतंत्र वसतिगृह
विद्यापीठ परिसरात विदेशी विद्यार्थ्यांसाठी ४० खोल्यांचे स्वतंत्र वसतिगृह आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठातील अन्य वसतिगृहे बंद करण्यात आली असली, तरी विदेशी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात आजही ३४ मुले वास्तव्यास आहेत.
चौकट.......
२० देशांतील विद्यार्थ्यांचे प्रवेश
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सन २०२१-२२ या नवीन शैक्षणिक वर्षात शिक्षण घेण्यासाठी २१ देशांतील विद्यार्थ्यांना भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेने शिष्यवृत्ती दिली आहे. यामध्ये अफगाणिस्तान- ३८, अंगोला- १, बांगलादेश- २, पश्चिम अफ्रिका (जीबूती)- १, इथोपिया- २, घाना- १, इराक- २, जॉर्डन- २, केनिया- २, दक्षिण अफ्रिका (लिसोथो)- २, दक्षिण अफ्रिका (मलावी)- १, पूर्व अफ्रिका (मोझांबिक)- १, नेपाळ- १५, पॅलेस्टाईन- ६, श्रीलंका- १, सुदान- २, सिरीया- १, टांझानिया- २, येमेन- ४१, झिंबाब्वे- १, आदी विद्यार्थ्यांचा समावेश आहे.