जिल्ह्यात सर्वदूर जोरदार पाऊस
By Admin | Published: June 6, 2016 12:02 AM2016-06-06T00:02:43+5:302016-06-06T00:21:07+5:30
जालना : शहराहसह जिल्ह्यात रविवारी दुपारी जोरदार वादळी पावसाने हजेरी लावली. जालना, वालसावंगी, परतूर, पारडगाव, घनसावंगी परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने
जालना : शहराहसह जिल्ह्यात रविवारी दुपारी जोरदार वादळी पावसाने हजेरी लावली. जालना, वालसावंगी, परतूर, पारडगाव, घनसावंगी परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने अनेकांच्या घरावरील पत्रे उडाली. झाडे उन्मळून पडली. वीजपुरवठा खंडित झाला.
रविवारी दुपारनंतर कडक ऊन असले तरी चार वाजेनंतर वातावरणात बदल होऊन पावसाला सुरूवात झाली. जालना शहरात हलकासा पाऊस झाला. वालसावंगी, परतूर, पारडगाव, घनसावंगी, सोनक पिंपळगाव, पारध, रामनगर, दुधना काळेगाव परिसरात जोरदार पाऊस झाला. वाऱ्याचा वेग जास्त असल्याने वालसावंगी, पारध आदी गावातील अनेक घरावरील पत्रे उडून गेली. पत्रे उडून गेल्याने ग्रामस्थांत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मोठमोठी झाडे उन्मळून पडल्याने वाहतूकही विस्कळीत झाली होती. शनिवारी मध्यरात्रीही जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला. रविवारी झालेल्या पावसामुळे शेतकरी सुखावला असून, पेरणीच्या कामांना वेग येईल अशी शक्यता शेतकरी वर्तवित आहेत. पावसामुळे ग्रामीण भागात सखल भागात चांगले पाणी साचले आहे. पत्रे उडून जाण्यासोबतच अनेक होर्डिगही तूटून पडले. आठवडी बाजारातही बाजारकरूंसह व्यापाऱ्यांचे मोठे हाल झाले. वेळेत पाऊस सुरू झाल्याने शेतकऱ्यांसह सर्व सामान्यांत समाधान व्यक्त होत आहे. काही शेतांमध्ये पाणी साचले आहे.
आष्टी: परतूर तालुक्यातील आष्टीसह परिसरात दुसऱ्या दिवशीही वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे फुलवाडी येथील सोपान निवृत्ती वाघमारे यांची गट क्रमांक १९ मध्ये असलेली लिंबोणीची बाग उद्ध्वस्त झाली. यात ३५ झाडे उन्मळून पडली. त्याचबरोबर अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील गोठे तसेच शेती साहित्याचे नुकसान झाले.
परतूर तालुक्यातील हातडी, श्रीष्टी, आष्टी ७० पेक्षा अधिक विजेचे खांब पडले आहेत. मुख्य वाहिनीचे दहा ते बारा वीज खांब पडले. दोन रोहित्रांचेही नुकसान झाले. परिणामी परिसरातील ४८ गावे अंधारात बुडाली आहेत. अंधारामुळे ग्रामस्थांचे हाल होत असून, महावितरण कंपनीने तात्काळ वीज खांबांची दुरूस्ती करावी, अशी मागणी होत आहे. बहुतांश ठिकाणी विजेच्या खांबांचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने वादळी पावसात खांब जमीनदोस्त होत आहेत. विशेष म्हणजे रोहित्रेही कोसळल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. वीजपुरवठा खंडित झाल्याने पाणीपुरवठावर परिणाम झाला आहे. पिठाच्या गिरण्याही बंद आहेत.