पोटच्या गोळ्याला सोडून माता गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 12:14 AM2017-11-24T00:14:45+5:302017-11-24T00:14:49+5:30

एका मातेने दोन महिन्यांच्या पोटच्या गोळ्याला बेवारस सोडून पलायन केल्याची घटना आज गुरुवारी जोगेश्वरीत घडली. या बेवारस चिमुकल्याला गावातील महिलांनी मायेची ऊब देत दुपारी त्यास एमआयडीसी वाळूज पोलिसांच्या स्वाधीन केले.

 Mother abandoned leaving stomach pills | पोटच्या गोळ्याला सोडून माता गायब

पोटच्या गोळ्याला सोडून माता गायब

googlenewsNext

शेख महेमूद ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वाळूज महानगर : एका मातेने दोन महिन्यांच्या पोटच्या गोळ्याला बेवारस सोडून पलायन केल्याची घटना आज गुरुवारी जोगेश्वरीत घडली. या बेवारस चिमुकल्याला गावातील महिलांनी मायेची ऊब देत दुपारी त्यास एमआयडीसी वाळूज पोलिसांच्या स्वाधीन केले.
याविषयी अधिक माहिती अशी की, जोगेश्वरी येथे बुधवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास एक ३० वर्षीय अनोळखी महिला स्वत:जवळ असलेले अंदाजे दोन महिन्यांचे बाळ घेऊन गावातील काही महिलांच्या घरी जाऊन माझे बाळ तुमच्याकडे ठेवा, असा आग्रह धरीत होती. मात्र, या महिलेला कुणीही ओळखत नसल्यामुळे तिच्या बोलण्याकडे फारसे लक्ष न देता तिच्या जवळ असलेले बाळ सांभाळण्यास त्यांनी नकार दिला. ही महिला गावातील एका कुटुंबाच्या ओट्याचा आसरा घेत त्या ठिकाणी झोपी गेली. आज गुरुवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास ही अनोळखी महिला पुन्हा जोगेश्वरीतील सामाजिक कार्यकर्त्या मीना पनाड यांच्या घरी पोहोचली होती. या अनोळखी महिलेने मी गेवराई, जि. बीड येथील रहिवासी असून, आई-वडिलांकडे चालले आहे, असे म्हणत माझ्याजवळील बाळ सांभाळा, अशी विनवणी त्यांच्याकडे केली होती. यानंतर मीना पनाड यांनी शेजारील महिलांना बोलवून घेत त्या अनोळखी मातेची समजूत काढत तुला काही त्रास असल्यास आम्ही निश्चितच मदत करू. मात्र, बाळाला कुणाकडे देऊ नको, अशी साद घालत तिचे मन परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. अशातच नळाला पाणी आल्यामुळे मीना पनाड यांनी त्या महिलेला येथेच बस, आपण पाणी भरल्यानंतर चर्चा करू, असे सांगून त्या व इतर महिला पाणी भरण्यासाठी निघून
गेल्या.
पोटच्या गोळ्याला बेवारस सोडून माता पसार
या वसाहतीतील महिला पाणी भरण्यासाठी निघून गेल्यानंतर त्या अनोळखी महिलेने आपल्याजवळील बाळ मीना पनाड यांच्या घराशेजारी टाकून ती घटनास्थळावरून निघून गेली. काही वेळानंतर बाळाच्या रडण्याचा आवाज आल्यानंतर मीना पनाड यांनी पाहणी केली असता बाळ घराच्या बाजूला बेवारस पडलेला त्यांना दिसून आले. त्यामुळे त्यांनी या बाळाला उचलून घेत शेजाºयांच्या मदतीने बाळाच्या आईचा परिसरात सर्वत्र शोध घेतला. मात्र, त्या बाळाची आई कुठेही मिळून आली नाही.
चिमुकल्याला केले पोलिसांच्या स्वाधीन
या बेवारस बाळाची माहिती मिळताच एमआयडीसी वाळूज पोलिसांनी जोगेश्वरीत जाऊन या बाळाला सोबत घेऊन पोलीस ठाण्यात आणले. यावेळी मीना पनाड व त्यांच्या सोबत असलेल्या मीना मुळे यांनी या बाळाला महिला पोलीस कर्मचारी आरती कुसळे, सुनीता भवरे यांच्या स्वाधीन केले.
याप्रसंगी फौजदार गौतम खंडागळे, पोहेकॉ. आर.डी. राजपूत, पोहेकॉ. पी.एस. बहुरे, पोहेकॉ. कारभारी देवरे, पोहेकॉ. हंबीर आदींची उपस्थिती होती.
या बाळाच्या आरोग्य तपासणीसाठी पोलिसांनी त्यास शासकीय रुग्णालयात दाखल केले असून, यानंतर त्या चिमुकल्यास बालसुधारगृहात पाठविले जाणार असल्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी सांगितले. याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात अनोळखी मातेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title:  Mother abandoned leaving stomach pills

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.