माता न तू वैरिणी...! आईने मारहाण करीत चिमुकल्यास गरम तव्यावर बसवून दिले चटके

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2023 01:19 PM2023-06-15T13:19:13+5:302023-06-15T13:25:20+5:30

पोटच्या गोळ्याला मारहाण करून दिले चटके; चाइल्ड हेल्पलाइन व पोलिसांनी केली तीन मुलांची सुटका

Mother beats child and burn, the two brothers with the baby were rescued | माता न तू वैरिणी...! आईने मारहाण करीत चिमुकल्यास गरम तव्यावर बसवून दिले चटके

माता न तू वैरिणी...! आईने मारहाण करीत चिमुकल्यास गरम तव्यावर बसवून दिले चटके

googlenewsNext

-महेमूद शेख
वाळूज महानगर :
जन्मदात्या आईने आपल्या ६ वर्षांच्या चिमुकल्याचा अमानुष छळ करीत त्यास मारहाण करून चटके दिल्याची खळबळजनक घटना वाळूज उद्योगनगरीत उघडकीस आली आहे. याचा व्हिडीओ दक्ष नागरिकाने चाइल्ड हेल्पलाइनला पाठविल्याने पोलिसांच्या मदतीने चाइल्ड हेल्पलाइनने मुलासह त्याच्या दोन भावांची सुटका केली.

घाणेगाव परिसरात आई, तिचा प्रियकर व दोन भावांसह वास्तव्यास असणाऱ्या अजय (नाव बदलले आहे) याला मारहाण करून त्याच्या शरीरावर चटके दिले असल्याचा व्हिडिओ सोमवारी एका दक्ष नागरिकाने बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष ॲड. आशा शेरखाने यांना पाठविला होता. शेरखाने यांनी चाइल्ड हेल्पलाइनच्या केंद्र समन्वयक अन्नपूर्णा ढोरे यांना या प्रकरणाची माहिती दिली होती. ही माहिती मिळताच चाइल्ड हेल्पलाइनचे समुपदेशक गोविंद तांगडे व आम्रपाली बोर्डे यांनी एमआयडीसी वाळूज पोलिसांच्या मदतीने सोमवारी घरमालकाकडे चौकशी केली असता महिला व पुरुष बाहेरगावी गेल्याचे समजले. तिन्ही भावंडे घरातच होती. विशेष म्हणजे हे कुटुंब पंधरा दिवसांपूर्वीच घाणेगावात किरायाने राहण्यासाठी आल्याचे घरमालकाने सांगत त्यांच्याविषयी अधिक माहिती नसल्याचे सांगितले. पोलिस व चाइल्ड हेल्पलाइनने अजय व त्याच्या दोन मोठ्या भावांना एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात नेले.

आईने मारहाण करीत गरम तव्यावर बसवून चटके दिले
पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांनी या मुलांना सुरुवातीला खाऊपिऊ घालून विश्वासात घेऊन चौकशी केली. मुलांनी आमचे पप्पा दुसरेच असून, आई नेहमी अजयला उपाशी ठेवून मारहाण करून चटके देत असल्याचे सांगितले. आईने अजयच्या पायाला चटके दिलेले असून, त्यास गरम तव्यावर बसविल्याने त्याचे व्रण उमटलेले आहेत. आईने केलेल्या मारहाणीत अजयचा उजवा पाय मोडला असून, तो लंगडत चालत असल्याचे त्याच्या मोठ्या भावांनी सांगितले. आई खायला देत नसल्याने अजय उघड्यावर पडलेले अन्नपदार्थ खाऊन भूक शमवित होता.

चिमुकल्याची बालसुधारगृहात रवानगी
पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांनी उपनिरीक्षक स्वाती उचित, पो.कॉ. सतवंत सोहळे, गणेश सागरे, किशोर गाडे, चाइल्ड हेल्पलाइनचे गोविंद तांगडे, आम्रपाली बोर्डे, विजय देशमुख यांच्या मदतीने मुलांना वैद्यकीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविले. नंतर तिन्ही भावांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली. महिला व तिच्यासोबत असलेल्या व्यक्तीने मंगळवारी बालसुधारगृहात जाऊन आम्हाला मुले नको असल्याचे बाल कल्याण समितीच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले. महिलेने सोबत असलेल्या इसमासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याचे व तो मुलांचा पिता नसल्याचे सांगितले. तिन्ही भावंडांनीही आईकडे परत जाण्यास नकार दिला. आईला मुलांच्या ओळखीचे पुरावे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले.

Web Title: Mother beats child and burn, the two brothers with the baby were rescued

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.