आई-बछड्यांची प्रकृती ठणठणीत; ‘समृद्धी’च्या बछड्यांची तज्ज्ञांकडून पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 07:51 PM2020-12-28T19:51:06+5:302020-12-28T19:53:08+5:30
Samrudhi Tiger, Aurangabad Municipal Corporation परभणी येथील कॉलेज ऑफ व्हेटरनरी सायन्सचे सहायक प्राध्यापक डॉ. तौहीद अहेमद शफी यांनी रविवारी प्राणिसंग्रहालयाला भेट देऊन बछड्यांची पाहणी केली.
औरंगाबाद : सिद्धार्थ उद्यानाच्या प्राणिसंग्रहालयात ‘समृध्दी’ या वाघिणीने २५ डिसेंबर रोजी पहाटे जन्म दिलेल्या पाच बछड्यांची आणि त्यांच्या आईच्या प्रकृतीची पाहणी रविवारी परभणी येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयातील तज्ज्ञ प्राध्यापकांनी केली.
चार वर्षांपूर्वी प्राणिसंग्रहालयातील बछडे मरण पावल्यामुळे देशभरात महापालिकेची नाचक्की झाली होती. त्यामुळे महापालिका प्रशासन समृद्धीच्या बछड्यांच्या बाबतीत कोणतीही रिस्क घेण्यास तयार नाही. प्राणिसंग्रहालयातील स्वच्छता, बछड्यांच्या घेतल्या जाणाऱ्या काळजीबद्दल तज्ज्ञांनी समाधान व्यक्त केले. बछड्यांची सहा आठवड्यांपर्यंत काळजी घ्या, दक्ष राहा. केअर टेकरशिवाय कुणालाही पिंजऱ्याच्या जवळ जाऊ देऊ नका, अशा सूचना यावेळी करण्यात आल्या.
परभणी येथील कॉलेज ऑफ व्हेटरनरी सायन्सचे सहायक प्राध्यापक डॉ. तौहीद अहेमद शफी यांनी रविवारी प्राणिसंग्रहालयाला भेट देऊन बछड्यांची पाहणी केली. महापालिकेच्या प्राणिसंग्रहालय सल्लागार समितीचे ते सदस्यदेखील आहेत. प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. बी. एस. नाईकवाडे यांनी त्यांना आवश्यक ती माहिती दिली.
आई-बछड्यांची प्रकृती ठणठणीत
बछड्यांची आणि त्यांच्या आईची प्रकृती ठणठणीत आहे, त्यांचे वर्तन सर्वसाधारण (नॉर्मल) स्वरूपाचे आहे. बछड्यांना आईचे दूध मुबलक प्रमाणात मिळत आहे, त्यामुळे त्यांची प्रकृती समाधानकार आहे. बछड्यांवर सहा आठवड्यांपर्यंत विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. बछड्यांसाठी पहिले सहा आठवडे काळजीचे (क्रिटिकल) असतात, त्यामुळे सहा आठवड्यांच्या काळात त्यांची योग्य निगा राखा, केअर टेकरशिवाय अन्य कुणालाही पिंजऱ्याच्या जवळ जाऊ देऊ नका, अशी सूचना आपण प्राणिसंग्रहालय व्यवस्थापनाला केली आहे. सध्या थंडीचे दिवस आहेत. बछड्यांना थंडीचा त्रास होऊ नये म्हणून पिंजऱ्यात हिटर लावले आहेत, असे डॉ. शफी यांनी सांगितले.