आई सोडून गेली, त्यांना कसे सांगणार हो ? समृद्धी महामार्गावरील अपघातातील १३ वा मृत्यू 

By संतोष हिरेमठ | Published: October 20, 2023 08:14 PM2023-10-20T20:14:15+5:302023-10-20T20:16:00+5:30

समृद्धी महामार्गावरील अपघातात जखमी महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

Mother died, how to tell them? 13th death in accident on Samruddhi Mahamarga | आई सोडून गेली, त्यांना कसे सांगणार हो ? समृद्धी महामार्गावरील अपघातातील १३ वा मृत्यू 

आई सोडून गेली, त्यांना कसे सांगणार हो ? समृद्धी महामार्गावरील अपघातातील १३ वा मृत्यू 

छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गावरील भीषण अपघातात जखमी झालेल्या महिलेचा घाटीत उपचारादरम्यान गुरुवारी (दि.१९) सकाळी मृत्यू झाला. संगीता दगू म्हस्के (४२, रा. नाशिक) असे मृत महिलेचे नाव आहे. घाटीतच उपचार घेणारे त्यांचे पती आणि मुलाला याविषयी कसे सांगणार, असा प्रश्न नातेवाइकांपुढे उभा राहिला. या भीषण अपघातातील मृतांची संख्या १३ झाली आहे.

समृद्धी महामार्गावर रविवारी रात्री टॅम्पो ट्रॅव्हलर समोरच्या ट्रकवर धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात १२ जण ठार, तर २३ जण जखमी झाले होते. यातील १७ जणांवर प्रारंभी घाटीत उपचार करण्यात आले. यातील संगीता म्हस्के यांच्यावर टीआयसीयूत उपचार सुरू होते. रुग्णालयात दाखल होतानाच त्यांची प्रकृती गंभीर होती. त्यांच्या छातीला गंभीर दुखापत झाली होती. घाटीत पहिल्या दिवसांपासून त्या व्हेंटिलेटरवर होत्या. गेल्या चार दिवसांपासून त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा होत नव्हती. डाॅक्टरांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू होते. मात्र, गुरुवारी सकाळी ८:४५ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

अपघातात जखमी झालेले त्यांचे पती दगू सुखदेव म्हस्के (५०) आणि मुलगा कमलेश म्हस्के हेही घाटीतच दाखल असल्याने त्यांना संगीता म्हस्के यांच्या मृत्यूची माहिती कशी सांगणार, असा प्रश्न नातेवाइकांपुढे उभा राहिला. यावर मार्ग काढण्यासाठी संगीता म्हस्के यांचे पार्थिव घाटीतून रवाना कऱण्यापूर्वी दगू म्हस्के आणि कमलेश म्हस्के यांना गावी घेऊन जायचे आणि नंतर तेथे त्यांना मृत्यूची कल्पना देण्याचे नातेवाइकांनी ठरविले.

रुग्णवाहिकेच्या नियोजनासाठी धावपळ
पार्थिव नाशिकला नेण्यासाठी रुग्णवाहिकेचे नियोजन करण्यासाठी नातेवाइकांची काहीशी धावपळ झाली. राजकीय नेत्यांपर्यंत ही माहिती पोहोचली. त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्यांसह घाटी प्रशासनानेही रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याचे नियोजन केले.

मिस्त्री काम करून उदरनिर्वाह
दगू म्हस्के हे मिस्त्री काम करतात. संगीता यांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांना आणि मुलाला देता आली नाही. गावी गेल्यानंतरच त्यांना माहिती देऊ. त्यांचा आणि मुलाचा उपचारही तिकडेच करू.
- त्र्यंबक म्हस्के, नातेवाईक

Web Title: Mother died, how to tell them? 13th death in accident on Samruddhi Mahamarga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.