आईने किडनी दिल्याने वाचले मुलाचे प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 11:10 PM2017-11-14T23:10:11+5:302017-11-14T23:10:15+5:30
कुंभार पिंपळगाव : तरूण मुलाच्या किडन्या निकामी झाल्याने आपल्या पोटच्या गोळ्याला वाचविण्यासाठी शेवटी आईच पुढे आली. २६ वर्षीय मुलाला ...
कुंभार पिंपळगाव : तरूण मुलाच्या किडन्या निकामी झाल्याने आपल्या पोटच्या गोळ्याला वाचविण्यासाठी शेवटी आईच पुढे आली. २६ वर्षीय मुलाला एक किडनी देऊन आपल्या मुलाला मृत्यूच्या दाढेतून बाहेर आणणाºया आईचे नाव नसीमबी अब्दुल समद देशमुख (५०) आहे. त्यांनी मुलगा महेमूद अब्दुल समद देशमुख (२६) याचा प्राण वाचविला.
मुलासाठी जीव धोक्यात घालणा-या आईची असंख्य उदाहरणे आहेत. अशीच एक मातृशक्तीची एक घटना कुंभार पिंपळगावला घडली आहे. आपल्या पोटच्या आणि कमावत्या मुलाची किडन्या निकामी झाल्याचे समजताच आईच्या पायाखालची जमीनच सरकली; मात्र मागे हटेल ती आई कसली? नसीमबी यांनी मुलाला किडनी देऊन मातृत्व धर्म पाळला. किडनी बदलण्यासाठी सुमारे १४ ते १५ लाख रू खर्च आला. ११ तारखेला औरंगाबाद येथील एका खाजगी रूग्णालयात किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉ. अजय बोरगावकर, डॉ. अभय महाजन, डॉ. शेखर शिराढोणकर पाटील यांनी शस्त्रक्रिया केली.
इलेक्ट्रॉनिक्सचा व्यवसाय करणारे महेमूद अब्दुल समद देशमुख यांना पाठदुखीचा त्रास वाढल्याने त्यांनी औरंगाबादला खाजगी रुग्णालयात तपासणी केली. तेव्हा दोन्ही किडन्या निकामी झाल्याचे समजले.
ग्रामस्थांची आर्थिक मदत
गावातील मनमिळावू व्यक्ती म्हणून मेहमूद देशमुख सर्वपरिचित आहेत. त्यांच्या उपचारासाठी युवकांनी अखंड हरिनाम सप्ताहामधील जमा झालेल्या लोकवर्गणीतून शिल्लक राहिलेली रक्कम महेमूदच्या उपचारासाठी मदत म्हणून दिली. आपल्या गावातील तरुणाच्या शस्त्रक्रियेच्या दिवशी ग्रामस्थांनी मंदिर, मशीद इ. ठिकाणी प्रार्थना केली. धनंजय कंटुले, अंकुश कंटुले, सोनाली कंटुले, अशोक कटुले, अनिल झुंजे, संतोष बोटे, संत सुतावणे, अन्वर पठाण आदींनी आर्थिक मदत केली.