पोटच्या तान्हुल्याला सोडून माता फरार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2020 08:46 PM2020-10-11T20:46:56+5:302020-10-11T20:47:36+5:30
एक्सरे काढून येईपर्यंत बाळाकडे लक्ष ठेवा, असे म्हणत ३ महिन्याचा मुलगा एका अज्ञात व्यक्तीकडे सोपवून आई जे गायब झाली ते पुन्हा आलीच नाही. रविवारी घाटी परिसरात घडलेल्या या घटनेमुळे अनेकांना माता न तू वैरीणी...याच ओळी आठवून गेल्या.
औरंगाबाद : एक्सरे काढून येईपर्यंत बाळाकडे लक्ष ठेवा, असे म्हणत ३ महिन्याचा मुलगा एका अज्ञात व्यक्तीकडे सोपवून आई जे गायब झाली ते पुन्हा आलीच नाही. रविवारी घाटी परिसरात घडलेल्या या घटनेमुळे अनेकांना माता न तू वैरीणी...याच ओळी आठवून गेल्या.
घाटीतील सर्जिकल इमारतीत रविवारी सकाळी एका रुग्णाच्या नातेवाईकाकडे एका महिलेने ३ महिन्याच्या मुलाला दिले आणि एक्सरे काढून येतेच, असे सांगून गेली. खूप वेळ झाला, तरीही ती महिला परत न आल्यामुळे त्या व्यक्तीने सुरक्षारक्षकांना याबाबत माहिती दिली. त्या महिलेचा घाटीत बराच वेळ शोध घेण्यात आला. परंतु ती महिला सापडलीच नाही.
यादरम्यान घाटीतील दोन महिला सुरक्षारक्षकांनी चिमुकल्याचा सांभाळ केला. या घटनेची माहिती बालकल्याण समितीला दिली असून बालकाला सध्या वार्ड क्रं. २५ येथे दाखल करण्यात आले आहे, असे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश हरबडे, प्रभारी बालरोग विभागप्रमुख डॉ. अमोल सुर्यवंशी यांनी सांगितले.