सुनेची नोकरी रद्द करण्यासाठी सासूचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 12:04 PM2018-09-25T12:04:47+5:302018-09-25T12:06:05+5:30
निर्मला पाल गागट या दोन नातवांसह वैद्यकीय अधीक्षकांच्या कार्यालयासमोर उपोषणाला बसल्या आहेत.
औरंगाबाद : लाड पागे समितीच्या वारसा हक्काने सुनेला दिलेली नोकरी रद्द करावी आणि अपंग मुलाला ही नोकरी देण्यात यावी, या मागणीसाठी एका सासूने सोमवारी घाटी रुग्णालयात उपोषण सुरू केले.
निर्मला पाल गागट या दोन नातवांसह वैद्यकीय अधीक्षकांच्या कार्यालयासमोर उपोषणाला बसल्या आहेत. घाटीत सफाईगार या पदावर कार्यरत असताना ३१ मे २०१५ रोजी त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. स्वेच्छानिवृत्तीनंतर लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार वारसा हक्काने त्यांच्या जागेवर सून अर्चना दीपक गागट यांना नोकरी देण्यात आली.
अर्चना गागट २९-२९ दैनिक वेतनावर तात्पुरत्या स्वरूपात नोकरी करीत असताना चांगल्या प्रकारे वागत असे. नोकरी कायमस्वरूपी झाल्यानंतर मात्र पतीला, नातवांना आणि मला सांभाळण्यास नक ार देत आहे. सुनेने शपथपत्रात चांगल्या प्रकारे सांभाळ करीन, अशी हमी दिली. वास्तविक ती वेगळी राहत आहे. त्यामुळे सुनेला दिलेली नोकरी रद्द करून अपंग मुलगा दीपक पाल गागट यांना देण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे निर्मला गागट यांनी केली आहे.
दीड वर्षापूर्वी अर्ज
यासंदर्भात दीड वर्षापूर्वी अर्ज करूनही दखल न घेतल्याने उपोषण सुरू केल्याचे निर्मला गागट यांनी सांगितले. यासंदर्भात लाड पागे समिती आणि वरिष्ठ पातळीवर निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती घाटी प्रशासनाने दिली.