सासूचा खून; सुनेस जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2018 12:23 AM2018-03-04T00:23:34+5:302018-03-04T00:23:38+5:30
सासू सखूबाईच्या डोक्यात वरवंटा आणि डंबेल्स मारून तिचा खून करणारी सून मंगलाबाई हिला अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही.बी. गव्हाणे यांनी जन्मठेपेची शिक्षा आणि ५ हजार रुपये दंड ठोठावला.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : सासू सखूबाईच्या डोक्यात वरवंटा आणि डंबेल्स मारून तिचा खून करणारी सून मंगलाबाई हिला अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही.बी. गव्हाणे यांनी जन्मठेपेची शिक्षा आणि ५ हजार रुपये दंड ठोठावला.
वाळूज परिसरातील मनीषानगरमध्ये समाधन महाजन (३७) त्याची पत्नी, आई आणि तीन मुलांसोबत राहत होता. त्यांच्यासोबत पेइंग गेस्ट म्हणून अविनाश पाटीलसुद्धा राहत होता. यावरून सासू आणि सुनेमध्ये कायम भांडणे होत होती. त्यामुळे घरमालकाने खोली खाली करण्यास सांगितले. त्याने वाळूजमध्ये अन्य ठिकाणी खोली भाड्याने घेतली.
काही सामान जुन्या घरी राहिल्यामुळे महाजनची आई सखूबाई झोपण्यासाठी तेथे जात होत्या. १ डिसेंबर २०१५ च्या रात्री मंगलाबाई आणि दोन मुले जेवणाचा डबा घेऊन गेल्या. जेवण करून सखूबाई झोपल्यानंतर मंगलबाई रात्री परत तेथे आली. जिन्यात झोपलेल्या सखूबाईच्या डोक्यात वरंवटा व डंबेल्स मारून तिचा खून करून घरी परत गेली. २ डिसेंबर २०१५ रोजी पहाटे जुन्या घराकडील शेजारी गजहंस हा महाजनच्या घरी आला. त्याने घडलेला प्रकार सांगितला.
महाजन यांनी जुन्या घराकडे धाव घेतली. जिन्यामध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सखूबाईला घाटी रुग्णालयात हलविले. वैद्यकीय अधिकाºयांनी सखूबाईला तपासून मृत घोषित केले.
महाजनच्या तक्रारीवरून वाळूज पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला. पोलीस निरीक्षक धनंजय येरुळे यांच्या पथकाने खुनाचा तपास करून महाजनची पत्नी मंगला हिला ताब्यात घेतले. तिची कसून चौकशी करण्यात आली असता तिने खून केल्याची कबुली दिली.
नऊ साक्षीदारांचे जबाब
खटल्याच्या सुनावणीवेळी सहायक लोकअभियोक्ता बाळासाहेब महेर यांनी नऊ साक्षीदारांचे जबाब नोंदविले. यात अविनाश पाटील यांची साक्ष महत्त्वाची ठरली. मंगलास रात्री गाऊनमध्ये झाकून वस्तू नेत असताना पाहिले असल्याचे त्याने न्यायालयात सांगितले. फिर्यादी समाधान महाजन फितूर झाला. मात्र, न्यायालयाने परिस्थितीजन्य पुरावा आणि न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा अहवाल ग्राह्य धरून मंगलबाईला खुनाच्या आरोपाखाली वरीलप्रमाणे शिक्षा व दंड ठोठावला.