दुसऱ्या लग्नानंतर आई बेपत्ता; १४ वर्षीय मुलीवर सावत्र वडिलांनी दोन वर्षे केले अत्याचार
By सुमित डोळे | Published: November 24, 2023 02:15 PM2023-11-24T14:15:12+5:302023-11-24T14:15:51+5:30
सामाजिक संघटनांच्या पुढाकाराने प्रकरण ठाण्यात- मुलीने दिली तक्रार
छत्रपती संभाजीनगर : आईने दुसरे आंतरधर्मीय लग्न केल्यानंतर तिच्या पहिल्या १४ वर्षीय मुलीवर सावत्र वडिलांनी दोन वर्षे अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली . विशेष म्हणजे, पीडित मुलीची आई दोन वर्षांपूर्वी संशयास्पदरीत्या बेपत्ता झाली. त्यानंतर सावत्र वडिलांनी मुलीला घरात विवस्त्र अवस्थेत नाचायला लावून मोबाईलमध्ये अश्लाघ्य व्हिडीओ रेकॉर्ड करणे सुरू केले. वडिलांच्या छळाला कंटाळून अखेर मुलीने घर सोडले व सामाजिक संघटनेच्या मदतीने पोलिसांकडे धाव घेतली. गुरुवारी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात याप्रकरणी वडिलावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.
पीडिता दोन वर्षांची असताना तिच्या आईने पहिल्या पतीसोबत घटस्फोट घेतला. त्यानंतर दुसरा आंतरधर्मीय विवाह केला. मात्र, त्याने आईचा छळ सुरू केला. त्यांच्यात रोज वाद सुरू झाले. एक दिवस सर्व भावंडे बाहेर असताना आईने तिला कॉल करून तातडीने घरी बोलावले. ती घरी गेली तेव्हा फक्त सावत्र वडील घरात होता. त्याच्या मानेभोवती ओरखडे होते. तसेच घरात काचेचे तुकडे पडलेले होते. मात्र, आई घरात नव्हती. शेजारच्यांनी पीडितेला आई जखमी अवस्थेत पळत होती व वडील तिच्या मागे पळत गेला, एवढेच सांगितले. त्यानंतर आठ दिवस वडील पीडितेसह अन्य मुलांना घेऊन मुंबईला चालल्या गेला.
मग वडिलांची वृत्ती बदलली
आठ दिवस मुंबईत राहून तो मुलांना घेऊन पुन्हा पुंडलिकनगर परिसरात राहण्यास आला. त्यानंतर मुलीवर अत्याचार सुरू केले. तिला सातत्याने दुधात औषध देऊन तो अत्याचार करत होता. तिच्या लग्नाचा प्रयत्नही सुरू केले. अनेकदा बळजबरीने काही पदार्थ खायला देणे सुरू केले. २३ ऑक्टोबर रोजी अखेर मुलीने घर सोडून मैत्रिणीचे घर गाठले. संघटनांच्या मदतीने पोलिसांकडे धाव घेतली. महिला सुरक्षा समितीच्या सदस्यांच्या उपस्थितीत तिचा जबाब नोंदवून रात्री यात गुन्हा दाखल करण्यात आला.